कोल्हापूर : आशियाई खंडातून १४ वर्षांखालील विम्बल्डन स्पर्धेसाठी मला खेळण्याची संधी मिळाली. माझ्या दृष्टीने जिंकण्यापेक्षा टेनिस करियरमधील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ही अनुभवाची शिदोरी मला पुढच्या स्पर्धामध्ये उपयोगी पडेल. अशी भावना विम्बल्डन स्पर्धा खेळून बुधवारी कोल्हापुरात परतलेल्या ऐश्वर्या जाधव हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.ऐश्वर्या म्हणाली, मी या स्पर्धेत चार सामने खेळले. त्यातील पहिला सामना कठीण होता. त्यानंतर ग्रासकोर्टवर कसे खेळायचे कळले. मला क्ले कोर्टवर खेळण्याचा अनुभव होता. तेथे ग्रासकोर्टवर खेळावे लागले. अशा कोर्टवर खेळण्याचा माझा पहिलाच प्रसंग होता. त्यासाठी केवळ तीन दिवसांचा सराव विम्बल्डन कोर्टवर मिळाला. त्या अनुभवावर मी चार सामने खेळले. तयारीला फार वेळ मिळाला नाही. त्यामुळे मला हार पत्करावी लागली.या स्पर्धेच्या अनुभवाचा आणि यापुढील स्पर्धेसाठी अव्वल मानांकित खेळाडू असल्याचा मला देशाला फायदा करून द्यायचा आहे. या स्पर्धेनंतर मी येत्या दोन दिवसांत स्पेन येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. यापुढेही मी पुन्हा वरिष्ठ गटातील स्पर्धेसाठी तयारी करणार आहे. ग्रॅंडस्लॅम स्पर्धा कार्यक्रमातील पाच देशांतील सामने मला खेळावयाचे आहेत. त्यातील विम्बल्डन स्पर्धेदऱम्यान तीन सामने खेळता आले नाही. यापुढील दोन सामने मी फ्रान्स व जर्मनीमध्ये खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघाकडून १ ते १० ऑगस्टदरम्यान झेक रिपब्लिक संघाविरोधात खेळणार आहे.
बिम्बल्डन माझ्या करियरसाठी महत्त्वाचा टप्पा, टेनिसस्टार ऐश्वर्या जाधवची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 6:41 PM