कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) नवजात बालक विभागप्रमुख डॉ. शिवप्रसाद हिरुगडे यांच्या बदलीमुळे या विभागाची अवस्था कोलमडली, असा आरोप सोमवारी सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीने केला. त्यांची बदली तत्काळ रद्द करावी, अशी मागणी करीत रुग्णालयातील प्रत्येक विभागाची बुधवारी (दि. ११) झाडाझडती घेणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाचा पंचनामा करणार असल्याचे समितीने सांगितले.सीपीआरमधील आरोग्य व्यवस्था व हिरुगडे यांच्या बदलीप्रश्नी महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात यांना कार्यकर्त्यांनी दुपारी जाब विचारला. समितीने यापूर्वी प्रशासनाला दिलेले अनेक प्रश्न गांभीर्याने घेतलेले नाहीत. तसेच गत आठवड्यात नवजात बालक विभागाचे सर्जन डॉ. शिवप्रसाद हिरुगडे यांची बदली झाली. या कारणासाठी सोमवारी समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता कार्यालयात थोरात यांना धारेवर धरले.सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीचे निमंत्रक वसंत मुळीक म्हणाले, कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नसताना हिरुगडे यांची बदली केल्यामुळे रुग्ण व्यवस्था कोलमडली आहे. त्यांना पूर्ववत इथे आणा. दोन महिने होऊनही सीपीआरचे खाते जिल्हा नियोजन समितीमध्ये उघडलेले नाही. त्यासाठी लागणारी कागदपत्रे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांनी जिल्हा नियोजन समितीला दिलेली नाहीत. त्यामुळे आरोग्यसेवेसाठी शासनाचा येणार निधी आलेला नाही. यामुळे रुग्णांना लागणारी यंत्रसामुग्री तसेच औषधे मिळण्यास अडचणी येत आहेत. अद्यापही व्हेंटिलेटर मशीन आलेले नाही परिणामी रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. बाबा इंदूलकर म्हणाले, सध्या रुग्णालयात औषधांचा उपलब्ध साठा किती आहे हे दाखवा, किती रुग्णांनी औषधांचा लाभ घेतला, अशी विचारणा केली. बबन रानगे म्हणाले, अपघात विभागामध्ये कार्यरत डॉक्टर, कर्मचाऱ्यांची नावे अद्यापही फलकावर लावली जात नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांचा संभ्रम होतो.काशिनाथ गिरीबुवा म्हणाले, रुग्णालयाच्या प्रत्येक जिन्यावर विद्युतयंत्रणा नाही, ती उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली.त्यावर डॉ. थोरात म्हणाले, माझ्याकडे तात्पुरता पदभार आहे. काळाची गरज ओळखून रुग्णालयात कर्करोग व मेंदूतज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक गरजेची असल्याचे सांगून त्यांनी कृती समितीच्या मागणीवर शिक्कामोर्तब केले.यावेळी भगवान काटे, कादर मलबारी, भाऊसो काळे, दिलीप पवार, मधुकर जांभळे, चंद्रकांत कांडेकरी, चंद्रकांत चव्हाण, राहुल घोरपडे, शंकर शेळके, महादेव पाटील, श्रीकांत भोसले, उमेश पोर्लेकर, प्रकाश पाटील, बबन सावंत, शिरीष देशपांडे, चंद्रकांत बराले, किशोर घाटगे, राजनाथ यादव, अजित नलवडे, मनोज नरके, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बुधवारी होणार झाडाझडती : सीपीआर बचाव कृती समितीकडून प्रभारी अधिष्ठाता धारेवर
By admin | Published: February 09, 2015 11:44 PM