कोल्हापूर : पहिल्या दिवशी वजन चाचणीवेळी स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झालेल्या अहमदनगरची भाग्यश्री फंड हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिला अंतिम लढतीत गुणांवर हरवत महिला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. तिला चांदीची गदा आणि अल्टो चारचाकी बक्षीस देण्यात आली. भाग्यश्रीला अपात्र ठरवण्याचा प्रयत्न झाल्यावर तिच्या वडिलांनी माझीच मुलगी महिला महाराष्ट्र केसरी होणार, असा विश्वास व्यक्त केला होता. तो तिने सार्थ ठरवला. भारतीय कुस्ती महासंघ आणि अस्थायी समितीतर्फे येथील शाहू खासबाग मैदानात या स्पर्धा झाल्या.स्पर्धेत महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांतून २०० महिला मल्ल सहभागी झाल्या होत्या. अंतिम दिवशी विविध गटांतील कुस्त्या झाल्या. महिला महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत भाग्यश्री विरुद्ध अमृता यांच्यात झाली. दोघीही पहिल्या सेकंदापासून आक्रमकपणे खेळत राहिल्या. दोघीही एकमेकींची ताकद अजमावण्याचा प्रयत्न करून एकमेकांना चितपट करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र शेवटपर्यंत दोघींनाही चितपट करता आले नाही. भाग्यश्रीला अधिक गुण मिळाल्याने ती महिला महाराष्ट्र केसरीची मानाच्या गदेची मानकरी ठरली.दरम्यान, उपांत्य फेरीची लढत अहमदनगरची भाग्यश्री फंड विरुद्ध सांगलीची प्रतीक्षा बागडी यांच्यात झाली. पहिल्या फेरीत प्रतीक्षाने भाग्यश्रीवर खेमेची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यातून ती शिताफीने सुटली. या वेळेत भाग्यश्रीने संथगतीने लढत केली. परिणामी प्रतीक्षाला एक गुण बहाल करण्यात आला. दुसऱ्या फेरीत प्रतीक्षाने एक गुण वसूल केला. प्रतीक्षाने संथगतीने लढत केल्याने भाग्यश्रीला एक गुण देण्यात आला. त्यानंतर प्रतीक्षाने दोन गुण गुण मिळवले. भाग्यश्रीने पुन्हा दोन गुण मिळवल्याने दोघींची गुण समान झाले. अखेरचा गुण भाग्यश्रीने घेतल्याने ती विजयी झाली. ती अंतिम लढतीला पात्र ठरली. अंतिम लढतीतही ती विजयी झाली.
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणपालकमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आयोजक अभिनेत्री दीपाली सय्यद, हिंदकेसरी योगेश दोडके, हिंदकेसरी संतोष वेताळ, माजी ऑलिम्पियन बंडा पाटील-रेठरेकर, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, पैलवान बाबा महाडिक आदींच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
गटनिहाय निकाल असा :५० किलो : नेहा चौगुले (कोल्हापूर), श्रृती येवले (पुणे शहर), समृद्धी घोरपडे (सांगली), साक्षी इंगळे (पुणे).५३ किलो : स्वाती शिंदे (कोल्हापूर), साक्षी चंदनशिवे (सांगली), आदिती शिंदे (पुणे),मेघना सोनुले (कोल्हापूर).५५ किलो : धनश्री फंड (अहमदनगर), स्मिता पाटील, विश्रांती पाटील (कोल्हापूर), अंजली पाटील (सांगली).५७ किलो : सोनाली मंडलिक (अहमदनगर), तनुजा जाधव (चंद्रपूर), तन्वी मगदूम (कोल्हापूर), श्रुती बामनावत (संभाजीनगर).५९ किलो : अंकिता शिंदे (कोल्हापूर), साक्षी पाटील (सातारा), कल्याणी मोहोर (नागपूर),पूजा लोंढे (सांगली).६२ किलो : सृष्टी भोसले (कोल्हापूर), संजना डिसले (सांगली), सोनिया सरक (सोलापूर), सिद्धी कणसे (सातारा).६५ किलो : ऋंखला रत्नपारखी (संभाजीनगर), पल्लवी पोटफोड, सिद्धी शिंदे (पुणे), अस्मिता पाटील (कोल्हापूर).अभिनेत्री सय्यद यांची मागणीमहाराष्ट्र केसरीची मानकरी ठरलेल्या महिला मल्लास शासकीय सेवेत वर्ग एकची अधिकारी म्हणून नोकरी मिळावी, अशी मागणी आयोजक अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केली. यापुढे ठाण्यात हिंदकेसरी घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
दहा दुचाकीची बक्षिसेविविध गटात सुवर्णपदक मिळवलेल्या विजेत्या मल्लास दुचाकी बक्षीस देण्यात आले. रौप्य आणि कांस्य पदक मिळवलेल्या मल्लास एक ग्रॅम सोन्याचा अंलकार देऊन गौरवण्यात आले.