नागरिकांनी वाचवले प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून पुईखडी कार्यालयातील कनिष्ठ कर्मचारी शिंगणापूर बंधाऱ्यावरून नदीच्या वाहत्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करत होता. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या वायरमानला पकडून ठेवण्यात आले. प्रशांत ढोणे, असे या कर्मचाऱ्यांचे नाव असून, ही घटना आज (रविवारी) दुपारी तीन वाजता घडली. त्याला करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आज शिंगणापूर बंधाऱ्यावर महापारेषणच्या ड्रेस कोडमध्ये असलेली एक व्यक्ती सकाळपासून हातात दोरी घेऊन अस्वस्थ अवस्थेत फिरत असल्याची माहिती येथील भेळविक्रेत्याने ग्रामस्थांना दिली. काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत या व्यक्तीची चौकशी सुरू केली. आपले नाव प्रशांत ढोणे, (मूळचा रा. उमरेड, जि. नागपूरचा) असल्याचे सांगितले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सध्या आपण महापारेषणच्या पुईखडी कार्यालयात कार्यरत असल्याचे त्याने सांगितले. या ठिकाणी तो गेल्या साडेतीन वर्षांपासून टेक्निशियन पदावर कार्यरत आहे. पुईखडी येथील वरिष्ठ अधिकारी विकास बंदी हे प्रशांत ढोणे यांना वारंवार त्रास देत आहेत, तसेच निलंबनाच्या कारवाईची धमकीही देत आहेत. याला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे पत्रही दिले होते; पण याची चौकशी न करता दोन दिवसांपूर्वी प्रशांत ढोणे यांना वरिष्ठ कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस आल्याने त्यांची मन:स्थिती बिघडली होती. आज सकाळी ढोणे कामावर न जाता आत्महत्या करण्याच्या विचाराने थेट शिंगणापूर बंधाऱ्यावर आला; पण त्याची आत्महत्या करण्याचे धाडस होत नव्हते. दुपारी तीन वाजता ग्रामस्थांनी ढोणे याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आपण आत्महत्या करून जीवन संपवणार असल्याचे सांगितले. शिंगणापूरचे पोलीस पाटील सर्जेराव मस्कर यांनी प्रशांत ढोणे याला करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले.
प्रशांत ढोणेचे आई-वडिलांना दोन पानी पत्र
आपल्याला होणारा अधिकारी विकास बंदी याचा त्रास सहन होत नाही. तुमच्याबरोबर फोनवरही बोलायला धाडस होत नाही. मी आत्महत्या करत असून, माझ्या पत्नी व मुलीला सांभाळा, असे दोन पानी पत्र प्रशांत ढोणेच्या खिशात मिळाले.
260921\img-20210926-wa0133.jpg
फोटो -प्रशांत ढोणे