कोल्हापूर : कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. एवढा गंभीर प्रकार घडूनही पोलिस आणि वनविभागाला याची काहीच माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक मदतनिसांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.दुचाकी चोरीच्या संशयावरून कोथरूड पोलिसांनी अटक केलेले तरुण दहशतवादी असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली. त्यांच्याकडे मिळालेल्या पेनड्राइव्हमधून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. या माहितीनुसार दहशतवाद्यांनी गेल्या वर्षभरात कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेतल्या. या माहितीचा अहवाल पोलिसांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध होताच, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी दहशतवादविरोधी विभागाचे अधीक्षक जयंत मीना यांच्याशी मोबाइलवरून चर्चा केली. इसिस या दहशतवादी संस्थेशी संबंधित असलेल्या स्थानिक संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. स्थानिक दहशतवादविरोधी पथकाकडूनही दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू आहे.
कोल्हापूर सॉफ्ट टार्गेट?शहरातून यापूर्वी इसिसशी संबंधित एका संशयिताला पोलिसांनी अटक केली होती. ताराबाई पार्क परिसरातील एका तरुणाचा दहशतवादी संघटनेत समावेश असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता थेट बॉम्बस्फोटाच्या चाचण्याच झाल्याची माहिती समोर आल्याने दहशतवाद्यांसाठी कोल्हापूर सॉफ्ट टार्गेट आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मदतनीस कोण?परराज्यातून आलेले दहशतवादी स्थानिकांची मदत घेतल्याशिवाय जंगलात जाऊन बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घेणे शक्य नाही. त्यांना मदत करणारे स्थानिक कोण आहेत? ते किती दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते? त्यांनी दहशतवादी कारवायांचे काही कट केले आहेत काय? ते कोणत्या दहशतवादी संघटनांसाठी काम करतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.