कोल्हापूर : तब्बल साडेपाच महिन्यांनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या एक हजारच्या खाली आली आहे. ३ एप्रिल २०२१ ला कोरोना रुग्णसंख्या १००४ नोंदवण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी १४ सप्टेंबरला ही रुग्णसंख्या ९७१ पर्यंत खाली आली. रोजची रुग्णसंख्या शंभरच्या आत, एकूण रुग्णसंख्या हजारच्या आत व मृत्यूची संख्याही कमी झाल्याने ही स्थिती दिलासादायक आहे.
गेल्या २४ तासांत ही रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून, नवे ७३ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. तिघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी २९ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये पुन्हा वाढ झाली असली, तरी रुग्णसंख्या शंभरच्या आत आहे.
एप्रिल महिन्यामध्ये रुग्णसंख्या वाढीला सुरुवात झाली आणि ३१ मे २०२१ रोजी जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ०१५ रुग्ण नोंदवण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या उतरण्यास सुरुवात झाली. साडेचार महिन्यांनी ही संख्या आता एक हजारच्या आत आली आहे. सध्या ९७१ रुग्णांवर उपचार सुरू असून, ११६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. हातकणंगले तालुक्यात २२, करवीर तालुक्यात आठ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. भुदरगड, चंदगड, गगनबावडा, शाहूवाडी या तालुक्यांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, तर जयसिंगपूर, कुरूंदवाड, गडहिंग्लज, शिरोळ, हुपरी, मलकापूर या नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातही नवा रुग्ण आढळलेला नाही.
करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव, हातकणंगले तालुक्यातील चोकाक आणि परभणी येथील एक अशा तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.