आर. एस. लाड ल्ल आंबाइको सेन्सेटिव्ह झोन म्हणून शाहूवाडीतील ५२ गावे व जंगल परिसर तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत आंबा, तळवडे, केर्ले, चांदोली, वाकोली ही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट आहेत. या जंगलातील वन्यजीव संपदा निसर्गचक्र पूर्ण करते. पण हेच वन्यजीव अधिवासातील पाण्याअभावी तडफडत आहेत. काही प्राणी पाण्याविना बळी जात आहेत. एकीकडे पाऊस कमी होत आहे. तर दुसरीकडे जंगलतोड, वणवे जंगलातील पाणी, चारा टंचाईला कारणीभूत ठरत आहे. साहजिकच पाण्यासाठी नदीकडे वळणारा जंगली प्राणी कडवी, कासारी व कानसा नदीच्या काठावरचे हिरवे पीक ओरबडतो आणि त्यातून कधी मानवावर तर कधी प्राण्यांवर हल्ले होताना दिसत आहेत. गेल्या सहा महिण्यांपूर्वी लोळाणे येथे एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ला-प्रतिहल्ल्यात बिबट्या ठार झाला. वणव्यामुळे जंगलातील चारा टंचाईची स्थिती गंभीर बनली आहे. पाण्यासाठी कडवी नदीकडे मोर्चा वळवणारे गवे-डुकरे नदीकाठच्या हिरव्या पिकात घुसून धुडगूस घालत आहेत. गेल्या आठवड्यात कडवी नदीकडे आलेला गवा जंगलाकडे परतताना घोळसवडे येथे डबरीवरून पडण्याचे निमित्त होऊन मृत्यू पावला. त्यापाठोपाठ तुरूकवाडीतही एक गवा जखमी झाला. पावसाळा आणखी दीड महिना दूर असताना पाणीटंचाईमुळे नदी व पाणीसाठ्याकडे वळणारे जंगली प्राणी शेतकऱ्यांच्याही तोंडचे पाणी पळवत आहेत.इको झोन, बफर झोन यामध्ये तालुक्यातील जंगलयुक्त ५२ गावे समाविष्ट असताना वन्य जिवांच्या चारा व पाण्याच्या उपलब्धतेसाठी निधी मिळत नाही. जैवविविधतेचे रक्षण करताना स्थानिकांचा सहभाग मोलाचा अपेक्षित असला तरी परिसरातील शेती टिकवण्यासाठी जंगली प्राण्यांचा उपद्रव होणार नाही, यासाठी वन्यजीव व वनविभागाने धडक मोहीम हाती घेऊन पुरेसा चारा व पाण्याचे रूपांतर पाणवठ्यात करण्याची आवश्यकता आहे.जंगल व वस्ती यादरम्यान चरखुदाई करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात वणवे पेटवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पाण्याचे दुर्भिक्ष आणि संधीसाधू शिकारी यांच्यासाठी जंगलातील पाणीटंचाई संधी ठरते. झरा परिसरात प्राण्यांच्या शिकाऱ्यांसाठी बंकर उभे केलेले दिसते. सभोवताली डहाळ्याचे कुंपण करून आत लपून बसण्यासाठी जागा शिकारी करतो. मात्र वनविभाग यापासून अनभिज्ञ राहतो, याचे आश्चर्य वाटते. वनविभागाने पाणवठ्याच्या पुनर्जीवनाबरोबर शिकारीवर निर्बंध घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे. (समाप्त)
इको झोनही पाण्याविना; जंगलतोड, वणव्यांची भर
By admin | Published: April 30, 2017 11:58 PM