राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी, पिरळ, घुडेवाडी, आवळी, कौलव, येळवडे, पुगाव, धामोड, राशिवडे, सोळांकूर, सरवडे, ठिकपुर्ली, वाळवे या गावांत कुंभार समाज मोठ्या प्रमाणात आहे. वर्षभर गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, बेंदर, नागपंचमी या सणात गणपती, गौराई, दुर्गा, बैल, नाग यांबरोबरच माठ, सुगडी, लोटकी यांसह अन्य मातीच्या वस्तूंची निर्मिती केली जाते.
मात्र वर्षभराच्या आर्थिक नियोजनाबरोबरच चार पैसे मिळवून देणारा सण म्हणून कुंभार बांधव गणेशोत्सव सणाकडे पाहत असतात. या काळात हातातील सर्वच कामे बाजूला ठेवून कुंभार व्यावसायिक श्रींच्या मूर्ती निर्मिती कार्यात लहान थोरांपासून वृद्धापर्यंत सर्वजण झोकून देतात. गणेश चतुर्थीच्या अगोदर किमान चार महिन्यांपासून कुंभारवाड्यात लगबग सुरू होते.
गेल्या दोन वर्षांच्या काळात महापूर व त्यानंतर आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गणेशोत्सवावर पर्यायाने श्रींच्या उंचीवर अनेक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे कुंभार व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन संपूर्ण वर्षभरात अर्थकारण बिघडणार आहे. असे असले तरीही जास्तीत जास्त श्रींची विविध आकर्षक रूपात व आभूषणांच्या माध्यमातून मूर्तींची निर्मिती करून जास्तीचे चार पैसे मिळविण्याचा प्रयत्न कुंभार बांधवांकडून होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कुंभार व्यावसाय महापूर व कोरोनामुळे आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करत आहे. श्रींच्या मूर्तीच्या उंचीवर निर्बंध लादल्याने मोठा फटका या व्यवसायाला बसला असून, शासनाने कुंभार व्यावसायिकांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून अडचणीतील या व्यवसायाला उभारी देण्याची गरज आहे.
( मूर्तिकार संदीप कुंभार- कुंभारवाडी)
-