ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 27 - कोल्हापुरात शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतच मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक महिलेने एका गोंडस परी जन्म दिला आहे. बाळ व आई दोघीही सुखरूप आहेत. डिलिव्हरी झाल्यानंतर आईचा जीव भांड्यात पडला. हो... कारण वेळच तशी होती. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमुळे गरोदर महिलेला जीवदान मिळाले आणि तिनं आपल्या परीलाही जन्म दिला.
परीच्या जन्माची कहाणी !कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरचा वाघबीळ घाट ओलांडून थोडसं पन्हाळ्याच्या बाजूला सरकले की नागमोडी वळणाच्या वाघबीळ घाटाच्या अखेरच्या वळणावर, बांबरवाडी नावाचं छोटं गाव आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस. थंडगार वारा. त्यात मध्यरात्रीची वेळ अशातच बांबरवाडी गावच्या कोपऱ्यावर हॉटेलामध्ये आचाऱ्याचं काम करणाऱ्या संभाजी बडेच्या पत्नीला असह्य अशा प्रसव वेदना सुरू झाल्या. ओसाड- दुर्गम भागात रात्रीच्या वेळी आजूबाजूला दवाखान्याची कोणतीही सुविधा नाही. यावेळी कुणी तर पटकन वैद्यकीय मदतीसाठी फोनवरुन 108 क्रमांकावर संपर्क साधला आणि पलीकडून 15 मिनिटांत पोहोचतो, असे उत्तर मिळालं.डॉ.अभिजित जाधव जोतिबाच्या डोंगरावर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसोबत कर्तव्य बजावत होते. फोन आल्या आल्या त्यांनी रुग्णवाहिकेच्या आपल्या पथकाला सोबत घेऊन चालकाला रुग्णवाहिका बांबरवाडीच्या दिशेला घेण्यास सांगितले. सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतर कापून अवघ्या 15 मिनिटांत ते संभाजी बडे राहत असलेल्या घरासमोर पोहोचले सुद्धा.
संभाजीची पत्नी साक्षी असह्य प्रसव वेदनांनी व्याकुळ झाली होती. तिच्यात त्राण उरला नव्हता. त्यामुळे डॉक्टर अभिजित जाधव यांनी रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. बरोबर रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी एका गोंडस परीने या रुग्णवाहिकेतच जन्म घेतला. यावेळी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या वैद्यकीय पथकातील सर्वांनी आनंद साजरा केला. साक्षीने जन्म दिलेल्या गोंडस परीची नाळ कापण्यासाठी तिला पन्हाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. आईला पुढील उपचारासाठी तेथेच दाखल करण्यात आले. आता आई आणि तिची नुकतीच जन्मलेली परी सुखरूप आहेत.
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी शासनाने नागरिकांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेसाठी दाखल केल्या आहेत. रस्त्यावरचे अपघात असोत अथवा तत्काळ वैद्यकीय मदतीची गरज असो तुम्ही केवळ 108 क्रमांक फिरवला की तुमच्या दारातून रुग्णालयात घेऊन जाणारी रुग्णवाहिका तज्ञ वैद्यकीय पथकासह लगेच हजर होते. तुमच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी जिवाचा आटापिटा करून सर्वजण कामाला लागतात.
गेल्या तीन वर्षांपासून या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या वैद्यकीय पथकाचे अहोरात्र, अविश्रांत 24 तास काम सुरू आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागातील हजारो रुग्णांना आणि कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील अपघातग्रस्तांना या रुग्णवाहिकेमूळे जीवदान मिळाले आहे, असे या रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथक प्रमुख डॉ अभिजित जाधव अभिमानाने सांगतात.