लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव: लाटवडे येथे लसीकरणाच्या ठिकाणी किरकोळ कारणावरून दोन्ही गटांत मारहाणीचा प्रकार घडला. दोन्ही गटांनी परस्पर विरोधात तक्रारी दिल्या आहेत. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजता लसीकरणाच्या वेळी घडला. या प्रकरणी दोन्ही बाजूच्या सातजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामपंचायत सदस्या स्वाती उत्तम पाटील, अभिजित अशोक पाटील यांनी फिर्यादी दिल्या आहेत. याप्रकरणी या दोघांसह अशोक बाजीराव पाटील, संजय बाजीराव पाटील, विश्वजित संजय पाटील,
उत्तम रंगराव पाटील, राहुल बाबासो पाटील (सर्व रा. लाटवडे, ता. हातकणंगले ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास हवालदार रवींद्र गायकवाड करीत आहेत.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, लाटवडे येथील वाल्मीकी मंदिरात लसीकरण सुरू होते. यावेळी गावातील अभिजित पाटील याने ग्रामपंचायत सदस्यांच्या हाताला पकडून लसीकरणासाठी विरोध केला. यावेळी त्यांचे पती उत्तम त्यांना जाब विचारण्यास गेले असता अभिजित पाटील, त्यांच्या सोबत असलेले अशोक पाटील, संजय पाटील, विश्वजित पाटील यांनी मिळून शिवीगाळ करून चप्पलने मारहाण केली.
दुसऱ्या विरोधी तक्रारीनुसार तिघांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी उत्तम रंगराव पाटील, स्वाती उत्तम पाटील, राहुल बाबासो पाटील (सर्व रा. लाटवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीनुसार ग्रामपंचायत सदस्या लस घेण्यासाठी जात होत्या. यावेळी त्यांना रांगेतून जावा असे सांगत असताना फिर्यादीच्या आई-वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राहुल पाटील यांनी काठीने मारहाण केली. या मारहाणीत सुरेखा पाटील, अशोक पाटील जखमी झाले आहेत.