कोल्हापूर : डोशाचे पीठ तयार करताना ग्रायंडरमध्ये साडीचा पदर अडकून गळ्याला फास लागल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. लता रत्नाकर रेवणकर (वय ४८, रा. खंडोबा तालमीजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्घटना सोमवारी (दि. १६) रात्री साडेसातच्या सुमारास रेवणकर यांच्या घरात घडली.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, अंबाबाई मंदिर परिसरात जोतिबा रोडला रेवणकर यांचे साई डोसा सेंटर आहे. सोमवारी रात्री लता रेवणकर या घरातील ग्रायंडर मशीनवर डोशाचे पीठ तयार करीत होत्या. अचानक साडीचा पदर मशीनमध्ये अडकून त्या ओढल्या गेल्या. त्याचवेळी गळ्याला साडीचा फास लागून त्या कोसळल्या. आई फोन उचलत नसल्याने मुलाने हॉटेलमधून शेजाऱ्यांना फोन केला. शेजाऱ्यांनी रेवणकर यांच्या घरात जाऊन पाहिले असता, त्या निपचित पडल्याचे दिसले. याची माहिती मिळताच मुलगा रोहित घरी आला. सीपीआरमध्ये दाखल केले असता, उपचारापूर्वीच लता यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रेवणकर यांच्या पश्चात सासू, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.मुलाचे लग्न पाहायचे राहून गेलेलता रेवणकर यांच्या मुलाचा साखरपुडा झाला असून, दिवाळीनंतर लग्नाचा मुहूर्त काढायचा होता. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. तत्पूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे खंडोबा तालीम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रायंडरमध्ये साडीचा पदर अडकून महिला ठार, कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 12:06 PM