कोल्हापूर : कौटुंबिक वादाच्या तक्रार अर्जानंतर समुपदेशन करून वाद मिटवल्याबद्दल दोन हजार रुपयांची लाच घेणारी महिला कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. काजल गणेश लोंढे (वय २८, रा. पसरिचा नगर, सरनोबतवाडी, ता. करवीर) असे अटकेतील लाचखोर महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षात ही कारवाई झाली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने महिन्यापूर्वी पत्नीच्या विरोधातील कौटुंबिक वादाचा अर्ज महिला सहाय्य कक्षात दिला होता. कॉन्स्टेबल काजल लोंढे हिने तक्रारदार पती आणि त्याच्या पत्नीस समोरासमोर बोलवून समुपदेशन केले. तंटा मिटून ते दाम्पत्य एकत्रित राहू लागले. तंटा मिटल्याचे समजपत्र देण्यासाठी लोंढे हिने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी करून तातडीने गुरुवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात सापळा रचण्यात आला. लोंढे हिने महिला सहाय्य कक्षात दोन हजारांची लाच स्वीकारताच पथकाने तिला रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांच्यासह प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, विकास माने, सचिन पाटील, संगीता गावडे, पूनम पाटील यांनी ही कारवाई केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौ-याच्या पूर्वसंध्येला थेट पोलिस अधीक्षक कार्यालयातच महिला पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाखालीच असलेल्या महिला सहाय्य कक्षात ही कारवाई झाली.