कोल्हापूर : मोफत तांदूळ, साखर देण्याचे आमिष दाखवून सोन्याचे दागिने लुबाडून पोबारा केलेल्या महिलेस शाहूपुरी पोलिसांनी आठ दिवसांत अटक केली. लक्ष्मी जोगेश नायडू (वय ५०, रा. प्रियदर्शनी कॉलनी, उचगाव, ता. करवीर) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १ फेब्रुवारी रोजी संजीवनी यशवंत लोंढे (वय ५०, रा. अंबाबाई मंदिरनजीक, कंदलगाव, ता. करवीर) या महिलेस एक अनोळखी महिला स्टेशन रोडवर भेटली. तिने लोंढे यांचा विश्वास संपादन करून त्यांना मोफत तांदूळ व साखर देण्याचे आमिष दाखवले. त्यांना रिक्षातून प्रथम नागाळा पार्क व नंतर गंगावेशमधील एका दुकानात नेले. तेथे, तुम्हाला श्रीमंत समजून साखर, तांदूळ देणार नाहीत; त्यामुळे तुमचे दागिने काढून द्या असे सांगून लोंढे यांच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले, कानातील बुगड्या असा सुमारे ३३ हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेतले. त्यानंतर त्या ठकसेन महिलेने त्यांना गंगावेशमध्ये थांबवून दागिने घेऊन पोबारा केला होता. त्याबाबत लोंढे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती.
तक्रारदार लोंढे यांनी संशयिताचे सांगितलेल्या वर्णनानुसार शाहूपुरी पोलिसांनी तातडीने तपास करीत मंगळवार संशयित आरोपी लक्ष्मी नायडू या महिलेस अटक केली. तिच्याकडून गुन्ह्यातील लुबाडलेले सर्व दागिने हस्तगत केले.