कोल्हापूर : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील वाघबीळ येथे अज्ञात वाहन व दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत मिरज येथील युवती ठार, तर युवक जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. ऋता विनोद कोकाटे (वय १८, रा. द्वारकानगर, कुपवाड रोड, मिरज, जि. सांगली) असे मृत युवतीचे नाव असून, अभिषेक कुमार कोडते (२३, रा. सलमान हॉटेलजवळ, कुपवाड रोड, मिरज) हा जखमी झाला. अभिषेकवर कोल्हापुरातील कदमवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत नातेवाइकांनी सांगितले की, मिरज येथील अभिषेक कोडते व ऋता कोकाटे हे दोघेजण दुचाकीवरून पन्हाळा येथे शनिवारी सकाळी गेले होते. सायंकाळी हे दोघे दुचाकीवरून पन्हाळ्याहून कोल्हापूरकडे वाघबीळमार्गे येत होते. त्यावेळी अज्ञात वाहनाची व अभिषेकच्या दुचाकीची धडक झाली. या धडकेत ऋता कोकाटे ही महाविद्यालयीन तरुणी जागीच मृत झाली, तर अभिषेक जखमी झाला. अपघातानंतर या दोघांना जखमी अवस्थेत नागरिकांनी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी जखमी झालेल्या अभिषेकवर प्राथमिक उपचार करून त्याला खासगी रुग्णालयात पाठविले. अभिषेकच्या मोबाईलवरून कोकाटे व कोडते या कुटुंबीयांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मृत ऋता कोकाटे यांची आई मनाली, भाऊ, इतर नातेवाईक व अभिषेकचे वडील कुमार कोडते हे ‘सीपीआर’मध्ये आले. मुलगी मृत झाल्याचे समजताच ऋताच्या आईला शोक अनावर झाला. मृत ऋता कोकाटे ही विश्रामबाग येथील चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयात बी. बी. ए.च्या द्वितीय वर्षात, तर अभिषेक हा बी.बी.ए.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत. ऋताचे वडील आर्किटेक्ट-इंजिनिअर असून, आई गृहिणी आहे. जखमी अभिषेकच्या वडिलांचा कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय आहे. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत रात्री उशिरा झाली. (प्रतिनिधी)
वाघबीळ येथे वाहनाच्या धडकेने युवती जागीच ठार
By admin | Published: November 15, 2015 1:03 AM