सेनापती कापशी : वडगांंव-बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) दरम्यान चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर शेतात पलटी होऊन एक ऊसतोड महिला ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. रुक्मिणी दिगंबर खांडेकर (४०, रा. ईळगाव, जि. परभणी,ता. गंगाखेड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मच्छिंद्रनाथ लक्ष्मण गुळवे हा मुलगा गंभीर जखमी झाला असून नऊ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
गंगाखेड तालुक्यातील ऊसतोड मजुरांची टोळी गेला महिनाभर बेलेवाडी काळम्मा येथे ऊसतोड करीत होती. या टोळीची छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या सांगाव येथील सेंटरला बदली झाली. यामुळे कोगनोळी येथील रामगोंडा अलगोंडा पाटील यांच्या ट्रॅक्टरने ते सांंगावकडे चाललेे होते. वडगांवजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्ता सोडून खाली गेला व शेतात पलटी झाला.
यामुळे ट्राॅलीत बसलेले सर्वजण बाहेर फेकले गेले तर काही ट्राॅलीखाली सापडले. यात रुक्मिणी खांडेकर यांचा मृत्यू झाला. पाटील हे दुचाकीने ट्रॅक्टर पाठोपाठ येत होते. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ बेलेवाडी काळम्मा येथील मित्रांना दिली. गावातील लोकांनी ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने सर्व जखमींना बाहेर काढले.
या अपघातात रुक्मिणी खांडेकर ही महिला ठार तर मच्छिंद्रनाथ गुळवे हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमींना गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले. जखमींना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यासाठी अक्षय साबळे, सूरज साबळे, धनाजी नार्वेकर, प्रमोद सुतार,बाळकृष्ण पाटील व सूरज पाटील, नेताजी साबळे यांचे दोन ट्रॅक्टर, सुरेश चव्हाण यांचा जेसीबी व आरोग्य सेवक हणमंत मुंढे यांनी मदत केली.
फोटो:- वडगांव (ता.कागल) येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्ता सोडून थेट शेतात जाऊन पलटी झाला.
फोटो:- सार्थक कापशी