कोल्हापूर : स्त्रीमध्ये क्षमता, कारूण्य आणि धाडस ही गुणवैशिष्ट्ये आहेत. भारतातील अनेक स्त्रियांनी या देशाला पुढे नेण्याचे कार्य केले आहे. पाठीवर मुलाला घेऊन रणांगणात लढणारी स्त्री केवळ भारतात जन्मली आहे. भारतीय स्त्रियांमध्ये जग जिंकण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री मनिषा कोईराला यांनी केले. शाहूपुरी जिमखाना मैदानात डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप आणि प्रतिमा सतेज पाटील वेलफेअरच्यावतीने आयोजित गृहिणी महोत्सवाचा शुक्रवारी शानदार समारोप झाला. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर शांतादेवी डी. पाटील, संजय पाटील, आमदार सतेज पाटील, प्रतिमा पाटील, वैजयंती पाटील, ऋतुराज पाटील, श्रृती शिंदे उपस्थित होत्या. यावेळी विजया पाटील, उषा काकडे, ऋचा पुजारी, खुशी कांबोज, दिव्या मगदूम यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.मनिषा कोईराला म्हणाल्या, झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, अहिल्यादेवी होळकर अशा कितीतरी महिलांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे. स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. मात्र, अख्ख्या घराची काळजी करणारी स्त्री स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. महिलांनी आधी स्वत:वर प्रेम केले पाहिजे. फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये महिला सक्षमीकरणासाठी या फाऊंडेशनची स्थापना केली असल्याचे सांगितले. यावेळी कोल्हापूर हायस्कूल व उषाराजे हायस्कूल तसेच शुभम चौगुले, तेजश्री चौगुले या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजाराची मदत करण्यात आली. शुक्रवारी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत मनीषा पोवार, अनिता गुरव, वृषाली शिंदे, सारिका मुरगुडे, वर्षा गुप्ता यांनी पारितोषिक पटकाविले. पुष्परचना स्पर्धेत चिनार भिंगार्डे, संगीता सावर्डेकर, तेजल सावंत, तनिशा तायडे, निधी सावर्डेकर विजेत्या ठरल्या. या महोत्सवात उभारण्यात आलेल्या स्टॉल्सना करवीरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या तीन दिवसांत महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून आपल्या वस्तंूची विक्री केली.शाहूपुरी जिमखाना मैदानात डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप आणि प्रतिमा सतेज पाटील वेलफेअरच्यावतीने आयोजित ‘गृहिणी महोत्सवा’त शुक्रवारी अभिनेत्री मनिषा कोईराला यांच्या हस्ते खुशी कांबोजचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील, प्रतिमा पाटील, संजय पाटील उपस्थित होते. यावेळी अनुक्रमे ऋचा पुजारी, दिव्या मगदूम, विजया पाटील आणि उषा काकडे यांचाही सत्कार करण्यात आला.
स्त्रीमध्ये जग जिंकण्याची क्षमता
By admin | Published: March 11, 2017 12:37 AM