कोल्हापूर : बनावट प्रमाणपत्र सादर करुन सीपीआरमध्ये प्रयोगशाळा सहायक पदाची नोकरी मिळविणाºया महिलेने हुलकावणी दिली. ऊर्मिला राकेश भारती-पुरी (रा. भादोले, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रयोगशाळा सहायक पदाची भरती होती. त्यासाठी डीएमलटीची अट होती. ही परीक्षा उत्तीर्ण नसताना ऊर्मिला भारती-पुरी हिने १९९८ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यासंबधी खोट्या सही-शिक्याचे प्रमाणपत्र तयार केले.
ते संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई व राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताना सादर केले. त्यानुसार १ एप्रिल २००८ ते १४ जुलै २०१७ अखेर सीपीआरमध्ये नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी प्रशासनअधिकारी अनिल चंद्रकांत खटावकर यांनी फिर्याद दिली.
याप्रकरणी तपास अधिकारी पाटील यांनी भारती-पुरी यांचेशी संपर्क साधून चौकशीसाठी शनिवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. हे प्रमाणपत्र कोठुन बनविले, त्यासाठी कोणी सहकार्य केले. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी किती पैसे खर्च केले आदी मुद्यांवर तपास सुरु आहे.