जत : जत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सीमा माणिकराव आघाव (वय २५) व त्यांचे पती दत्ता हरिभाऊ बडे (वय २७, रा. पोलीस वसाहत, जत, मूळ रा. खामगाव, पो. शिरसाळ, ता. धारूर, जि. बीड) यांना चार हजार रुपयांची लाच घेताना निगडी कॉर्नर, जत येथे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. जत पोलिसात गुन्हा दाखल करून उभयतांना अटक करण्यात आली. हा प्रकार आज (गुरुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडला. धोंडीराम तम्माण्णा महाजन (वय ३०) रा. बिरूळ, ता. जत यांचे गावातील काही जणांबरोबर किरकोळ कारणावरून तीन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. धोंडीराम महाजन यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. याबाबतची फिर्याद त्यांनी जत पोलिसात दिली होती. या गुन्ह्याचा तपास सीमा आघाव करीत होत्या. या प्रकरणाचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी आघाव यांनी महाजन यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु महाजन यांनी पाच हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. आघाव यांनी त्यानंतर वेळोवेळी महाजन यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून व प्रत्यक्ष गावात जाऊन त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. दरम्यान, आज गुरुवारी महाजन यांनी आघाव यांना पैशाची व्यवस्था झाली असून, पैसे देण्यासाठी येण्याबाबत विचारणा केली. यावेळी आघाव यांनी त्यांना पोलीस ठाण्याऐवजी निगडी कॉर्नर चौकात येण्यास सांगितले. महाजन हे पैसे घेऊन आल्यानंतर आघाव या पतीसोबत येथे आल्या. पैशाबाबत महाजन यांना विचारणा करून पतीकडे द्यावेत, असे आघाव यांनी सांगितले. पैसे स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही रंगेहात पकडले. रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)
महिला उपनिरीक्षकाला लाच घेताना जतमध्ये अटक
By admin | Published: November 06, 2014 10:46 PM