कोल्हापूर-चुये : सद्या गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अनेक इच्छुकांनी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. आपल्यालाच पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी अनेकांनी फिल्डींग देखील लावली आहे. असे असतानाच कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील म्हाळुंगे गावामधील एका प्रमुख कार्यकर्त्याने आपण निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. अन् गावातील सुमारे साडेचारशे महिलांनी या नेत्यांच्या घरावरच ठिय्या आंदोलन केले. या नेत्याने अर्ज भरण्याचा शब्द दिल्यावरच महिलांनी त्यांचे दार सोडले.म्हाळुंगे गावातील चौगले यांचे घराणे नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जाणारे. वडिलांच्या निधनानंतर गेल्या पंचवार्षिकला त्यांच्या आई पार्वती चौगले या थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या. प्रकाश चौगले यांचा कोल्हापुरात पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय आहे. परंतु, त्यांनी गावाच्या विकासात लक्ष घालण्याचे ठरविले. अन् गावचा चेहरा मोहराच बदलून टाकला.यंदा सरपंचपद खुले असल्याने त्यांनी आता हा विकासाचा रथ अन्य कुणीतरी पुढे न्यावा म्हणून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रकाश यांनी घेतलेला हा निर्णय ग्रामस्थांना मान्य झाला नाही. अन् गावातील महिलांनी त्यांच्या घरावर धडक देऊन जोपर्यंत तुम्ही अर्ज भरण्याचा शब्द देत नाही, तोपर्यंत अन्न-पाणी घेणार नाही, असा निर्धार केला. शेवटी प्रकाश यांना ग्रामस्थांच्या आग्रहापुढे निर्णय बदलावा लागला.
नेत्याने निवडणूक न लढवण्याचं केलं जाहीर, ..अन् महिलांनी नेत्याच्या घरावरच मारला ठिय्या; कोल्हापुरातील घटना
By विश्वास पाटील | Published: November 24, 2022 5:43 PM