श्रीकांत ऱ्हायकरकोल्हापूर/धामोड : राधानगरी तालुक्यात पाणी टंचाईचे ढग यावर्षी प्रचंड गडद झाले आहेत. तालुक्याच्या पश्चिम बाजुस असणाऱ्या धामोड परिसरातील बहुतांशी वाडया- वस्त्या पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. पाल बु॥ गावामधील पाणीटंचाईची बिकट परस्थिती पाहता संतप्त ग्रामस्यांनी पाण्याचा रिकाम्या टाकी भोवती बसून तर माहिलांनी रिकाम्या घागरी गावच्या चौकात ठेऊन निषेध नोंदवला.साधारणता ५०० लोकवस्ती असणारे हे गांव चांदे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आहे. या गावासाठी दहा वर्षापूवी 'केकतीचा झरा ' नावाच्या ओढया जवळून थेट सायफनने पाणी गावाशेजारील टाकीत टाकून नळाद्वारे गावाला पुरविण्यात आले. पण गेल्या ४०ते ५० वर्षात पहिल्यांदाच ह्या झऱ्याचे पाणी या वर्षी आटल्याने गेल्या महिनाभरापासून गावात पाणीच नाही. पिण्याचे पाणी महिला चार ते पाच किलोमिटरची पायपीट करून आणत आहेत. ऊस पीक तर हातचे केंव्हाच निघून गेले आहे. ग्रामस्यांना व जनावरांना तर या भीषण पाणी व चारा टंचाईस गेल्या एक महीन्यापासून तोंड द्यावे लागत आहे.ग्रामपंचायतीची वाट न पाहता १ लाख रुपयाचा निधी वर्गणीच्या माध्यमातुन गावकऱ्यांनी गोळा करत दोन बोअर मारल्या पण त्याही बोअरना पाणी न लागल्याने पुन्हा एकदा एका कुटुंबाला १४०० रुपयाप्रमाणे वर्गणी गोळा करून या दोन दिवसात पुन्हा दुसरे बोअर घेण्याचा निर्णय केलाय.
घागरभर पाण्यासाठी पाच -सहा किलोमिटरची रोजची पायपीट करून घरात पाणी आणाणाऱ्या आईच्या डोळ्याकडे पाहिल्यावर माझे मन हेलावून जाते हे कुठेतरी थांबले पाहिजे . यासाठी शासन स्तरावरील निधीची वाट न पाहता गावातील तरूणांना एकत्र करून स्वनिधीतूनच पाणी टंचाईवर उपाय शोधायला आमचा प्रयत्न आहे .भगवान पाटील, ग्रामस्थ