कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहातील वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यास बडतर्फ महिला पोलीस उज्जला झेंडे यांनी गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्याबाबतची तक्रार तुरुंगाधिकारी मीरा विजय बाबर यांनी काल, रविवारी रात्री जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार झेंडे याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारनजीक घडली. याबाबत माहिती अशी की, बडतर्फ पोलीस कर्मचारी उज्जला झेंडे यांचा मुलगा एका प्रकरणात सद्या कळंबा कारागृहात आहे. त्या मुलाकडे कारागृहात तुरुंगाधिकारी बाबर यांनी काही माहिती विचारली होती. त्याबाबत मुलाने आपली आई उज्जला झेंडे यांना निरोप दिला. त्यानुसार झेंडे ह्या शनिवारी दुपारी एका सहकार्यासह कारागृहानजीक आल्या होत्या. त्यांनी तुरुंगाधिकारी बाबर यांना बाहेर बोलवले. त्यांनी, ‘माझ्या मुलाकडे गोळी कोणी मारली असे तुम्ही का विचारले’ असा जाब विचारत बाबर यांच्याशी वाद घातला. माझ्यात गोळ्या घालण्याची हिम्मत होती, म्हणून गोळ्या घातल्या. अजूनही मी गोळ्या घालू शकते, अशी धमकीही तीने दिली. त्यावेळी तुरुंगाधिकारी बाबर यांनी झेंडे व तिच्यासोबत आलेल्या सहकारीस तेथून हटकले. त्यावेळी झेंडे हिने त्यांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुंगाधिकारी बाबर यांनी झेंडे व बंगे या दोघांवर गैरवर्तन केल्याबाबती तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली, त्यानुसार दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.
माझ्यात गोळ्या घालण्याची हिम्मत, अजूनही गोळ्या घालू शकते; बडतर्फ महिला पोलिसाची तुरुंगाधिकाऱ्यास धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 5:01 PM