गडहिंग्लज : पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना गडहिंग्लज पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडली. रेखा भैरू लोहार (वय ३९, रा. हरळीरोड, लक्ष्मीनगरजवळ, भडगाव, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. काल, मंगळवारी (दि.२) झालेल्या या कारवाईमुळे शहरासह व तालुक्यात खळबळ उडाली.पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, डिसेंबर २०२३ मध्ये गडहिंग्लज पोलिस ठाण्यात एका दाम्पत्याविरुद्ध मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यात त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी लोहार हिने दोन हजारांची मागणी केली होती.दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल तक्रारीनुसार गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या परिसरात सापळा लावण्यात आला होता. पोलिस ठाण्यातच तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना लोहार हिला ताब्यात घेण्यात आले.पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, सुधीर पाटील, पूनम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कारवाई न करण्यासाठी घेतली दोन हजारांची लाच, गडहिंग्लजमध्ये महिला हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 11:54 AM