कोल्हापूर : पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आता ८ तासांची ड्यूटी बजावण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या. त्याचा लाभ ६५० हून अधिक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यासोबतच कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागते. त्यात बारा-बारा तासांची ड्यूटी (कर्तव्य) बजावताना कामाचा ताण येतो. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होत असे. त्यातून रजेचे प्रमाणही वाढले होते.या सर्व बाबींचा विचार करून गृहविभागाने महिला कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करण्याचे आदेश राज्य पोलीस दलाला दिले होते. तसे आदेशही जारी झाले होते.त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी शुक्रवारी प्रायोगिक तत्त्वावर यासंबंधीचे आदेश सर्व ठाण्याच्या प्रभारींना दिले. या आदेशात महिला कर्मचाऱ्यांना ८ तास ड्यूटी द्यावी, असे नमूद केले आहे.त्याचा लाभ ६५० अधिक महिला कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ड्यूटीचे चार तास कमी झाल्याची वार्ता कानी पडताच महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.