कोल्हापूर : आर्मीमध्ये नोकरीस लावतो म्हणून २८ लाख ९० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस सविता अप्पासाहेब पाटील व तिचा पती प्रवीण शिवाजी मरगजे (दोघेही रा. निवारा रेसिडेन्सी, शुगर मिल, कसबा बावडा, कोल्हापूर) या दोघा संशयितांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची तक्रार शैलेश प्रल्हाद खरात (वय ३६, रा. समर्थ पार्क, लाइन बाजार, कसबा बावडा) यांनी पोलिसांत दिली. माझ्याकडे पैसे मागितले तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवीन अशी थेट धमकीच संबंधित संशयित महिला पोलिसाने दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी शैलेश खरात व संशयित हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. संशयित मरगजे याने खरात यांना आर्मीमध्ये भरती सुरू झाली आहे, तुमच्या नात्यापैकी कोणाला भरती करावयाचे असेल, तर मला सांगा आपण आर्मीत भरती करू, असे विश्वासाने सांगितले. संशयित आरोपी महिला पोलीस सविता पाटील हिनेही, मी पोलीस आहे, माझा नवरा आर्मीत आहे, नोकरीची १०० टक्के गॅरंटी आहे. काम नाही झाले तर पैसे परत देऊ, असे विश्वासाने सांगितले. त्यानुसार खरात यांनी नातेवाइकांच्या मुलांना आर्मीत नोकरीस लावण्यासाठी प्रवीण मरगजे व सविता पाटील या दाम्पत्याला रोखीने व बँक खात्यावर रक्कम ट्रान्सफर केली. ही घटना जून २०१९ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान कसबा बावडा पोलीस लाइन व ताराबाई पार्क, पितळी गणपती मंदिरानजीक घडली.
दरम्यान, आर्मीत भरती न झाल्याने फिर्यादी खरात व मुलांनी त्या दोघा संशयितांकडे पैसे परतीची मागणी केली. त्यावेळी संशयित मरगजे याने थोडे पैसे परत दिले असून, अद्याप २८ लाख ९० हजार रुपये देणे बाकी आहेत. उर्वरित रक्कम परत मागताना संशयित मरगजे याने फिर्यादीस गोळ्या घालण्याची धमकी दिली, तर संशयित अरोपी महिला पोलीस सविता पाटील हिने फिर्यादीस, माझ्याकडे पैसे परत मागितलेस तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत दोघांवरही शाहूपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंद झाला असून, पोलीस उपनिरीक्षक सचिन पांढरे तपास करीत आहेत.
मला दोन खून माफ आहेत, सर्वांना गोळ्या घालीन
फिर्यादी व त्याच्या नातेवाइकांनी संशयिताकडे पैसे परतीसाठी तगादा लावला. त्यावेळी संशयित आरोपी प्रवीण मरगजे याने फिर्यादी व साक्षीदार नातेवाइकांना, तुम्ही मला जास्त तगादा लावू नका, मला त्रास झाल्यास मी कोणाला सोडणार नाही. मला मिल्ट्रीमध्ये दोन खून माफ आहेत, मला जास्त त्रास दिल्यास मी तुम्हाला सगळ्यांना गोळ्या घालीन, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.