समीर देशपांडेकोल्हापूर : महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान स्थापन झाल्यापासून गेल्या ७ वर्षांत राज्यातील महिला बचतगटांनी ६ हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून त्यातील ९३ टक्के कर्जाची परतफेडही केली आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी दिली.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ताराराणी महोत्सव उद्घाटनासाठी आलेल्या विमला यांची यानिमित्ताने विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी एकूणच राज्याच्या महिला बचतगट चळवळीचा आढावा घेतला.विमला म्हणाल्या, महिलांनी एकत्र येणे आणि आपसांत कर्जव्यवहार करणे हे आता नियमित झाले आहे. अभियान स्थापनेपासून महिलांनी आपसातच ८०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. सध्या या महिला छोटे ८००० उद्योग चालवितात आणि त्यांची वार्षिक उलाढाल १००० कोटी रुपये आहे.
सध्या आमच्याकडे १५ मार्केटिंग संस्था असून प्रत्येक संस्थेची अडीच कोटी रुपयांची उलाढाल आहे. नव्या वर्षात आम्हाला ही संख्या ५० वर न्यायची आहे. १० ते १५ बचतगट एकत्र आले आणि त्यांनी एखाद्या उत्पादनाची जबाबदारी घेतली तर अशाप्रकारे उत्पादनांची विक्री करण्यासाठी सामूहिक ताकद लागते. मोठ्या कंपन्याही खरेदीसाठी तयार होतात.आता आम्हाला त्यापुढे जावून त्यांचे मोठे उद्योग उभारण्यावर भर द्यावयाचा आहे. यापुढच्या काळात ‘नॅशनल रूलर इकॉनामिक ट्रांझिट प्रोजेक्ट’ या योजनेअंतर्गत बचत गटांनी मोठे उद्योग उभारावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अशा मोठ्या उद्योगांसाठी आमच्या विभागाकडे ५० कोटींचा निधी उपलब्ध आहे.अस्मिता सॅनिटरी नॅपकीनच्या दर्जाबाबत तक्रारी असल्याची विचारणा केली असता त्या म्हणाल्या, सुरुवातीला तक्रारी होत्या आणि त्यात तथ्यही होते. ३० मि.ली. द्रव शोषून घेण्याची याआधीच्या पॅडस्ची क्षमता होती. त्यामुळे राज्यभरातून तक्रारी आल्या. आता त्यात सुधारणा करून ७० टक्के द्रव शोषून घेतले जाते. त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे.मोठ्या मॉलमधून स्वस्त वस्तू खरेदी करून त्या किमान नफा घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना कमी दरात देण्यासाठी आम्ही परभणी, हिंगोली आणि ठाणे येथे ‘अस्मिता बझार’ सुरू केले आहेत. हीच योजना राज्यभर सुरू करण्याचा मानस आहे. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत युवकांना तीन-तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. याअंतर्गत प्रशिक्षण घेऊन छोटे-मोठे सेवा व्यवसाय सुरू करण्याची चांगली संधी आहे.राज्यातील महिला बचतगट चळवळ दृष्टिक्षेप
- एकूण महिला बचतगट ४ लाख २३ हजार
- सहभागी कुटुंबसंख्या ४८ लाख
- बचतगट ग्रामसंघ १७ हजार
- प्रभाग संघ ६०० हून अधिक
- सेंद्रीय शेतीमध्ये कार्यरत महिला ५ लाख
- मार्केटिंग कंपन्या १५
- कुक्कुटपालनमधील महिला २ लाख
- शेळी, मेंढीपालन महिला ३ लाख
- कुटिरोद्योगमधील १ लाख
ग्रामविकासमंत्र्यांकडून अपेक्षाआमच्या विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ हे ग्रामीण भागाचे अनेक वर्षे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांना महिला बचतगट चळवळीचे सामर्थ्य माहिती आहेत. त्यामुळे आमच्या विभागाला एक नवी दिशा देण्याचे काम ते करतील, असा आम्हाला विश्वास आहे.अंडी पुरवठ्यासाठी मोठी संधीसध्या महाराष्ट्राला रोज ३ कोटी अंडी लागतात. राज्यातूनच सध्या केवळ ६५ लाख अंडी पुरविली जातात. बाकी अंडी बाहेरून येतात. त्यातही मोठ्या शहरांमध्ये देशी अंड्यांना मोठी मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सध्या महिला बचतगटांच्यावतीने रोज १५ हजार अंडी पुरविली जातात. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण महिलेने जर कोंबड्या पाळण्याचा निर्णय घेतला तर राज्याला अंडी पुरवठा करण्याची ताकद आपण निर्माण करू, असे त्या म्हणाल्या.