कोल्हापूर : स्त्रीपासून विश्वाची उत्पत्ती होते म्हणून आपण तिला आदिशक्ती मानतो. एकेकाळी मातृसत्ताकपद्धती अस्तित्वात असलेल्या आपल्या देशात पुढे पुरुषसत्ताक पद्धती आली आणि स्त्रीला दुय्यम स्थान मिळाले. आपले स्थान पुन्हा मिळविण्यासाठी स्त्रियांनी आपल्यासमोर येणाऱ्या आव्हानांना धीराने सामोरे जावे, असे आवाहन राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी केले. येथील शाहू स्मारक भवनमध्ये अरुण नरके फौंडेशनच्यावतीने सुनीता नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ‘आव्हान स्त्री जीवनाचे’ या विषयावर विचारपुष्प गुंफले. यावेळी अरुण नरके उपस्थित होते.इनामदार म्हणाले, महिलांनी करिअरच्या वाटेवर कोणत्याही पुरुषाशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:शी स्पर्धा केली पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या संकटांना न भीता धैर्याने सामोरे गेले की आत्मविश्वास दुणावतो आणि आपण अधिक खंबीर बनतो. भारतीय समाजजीवनात स्त्री आणि संघर्ष हे समीकरण बनले आहे. आदिशक्ती म्हणून स्त्रीचा गौरव होताना शेतात नांगर आला आणि शारीरिक शक्तीच्या जोरावर पुरुषाने स्त्रीला दुय्यम स्थान दिले. आता स्त्रीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले असले, तरी तिच्यासमोरील आव्हानांचे स्वरूप बदलले आहे. एकाचवेळी सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, नोकरी-व्यवसाय अशा पातळीवर त्यांना संघर्ष करावा लागतो. त्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्त्रीने सक्षम झाले पाहिजे. रवींद्र उबेरॉय यांनी प्रास्ताविक केले. बाळ पाटणकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला.
स्त्रियांनी आव्हानांना सामोरे जावे
By admin | Published: March 03, 2015 12:21 AM