कोल्हापूर : महिलांमध्ये विविध स्वरूपांतील काम करण्याची मानसिकता असते. ही मानसिकता महिला सबलीकरणाची प्रक्रिया पूर्ण करते; त्यामुळे महिलांना आचार, विचार व्यक्त करणे, उद्योगनिर्मितीबाबत स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी गुरुवारी येथे केले.
येथील ताराराणी विद्यापीठातर्फे डॉ. व्ही. टी. पाटील तथा काकाजी यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमधील या कार्यक्रमात बहादरपूर (जळगाव) येथील सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा यांना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, ५१ हजार रुपयांचा धनादेश, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, दुष्काळी भागातील ज्या महिला घरातून बाहेर पडू शकत नव्हत्या, त्यांना स्वत:च्या पायावर उभा करण्याचे महत्त्वपूर्ण काम नीलिमा यांनी केले आहे. वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी कष्टातून सामाजिक कार्य सुरू केले. त्यांनी महिला, शेतकऱ्यांना ताकद दिली. बचत गटातून महिलांना सक्षम करून राष्ट्रनिर्मितीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. दुष्काळी भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासह बचत गटाच्या माध्यमातून त्यांना वैचारिक, आर्थिक स्थैर्य देणाºया नीलिमा यांना प्रदान केलेला पुरस्कार महिला सबलीकरणाचा सन्मान आहे.
नीलिमा मिश्रा म्हणाल्या, ताराराणी यांचे नाव उच्चारताच रक्त सळसळते, लढाई अजून बाकी असल्यासारखे वाटते. त्यांच्या नावाच्या पुरस्काराने आज झालेला सन्मान हा केवळ माझा नव्हे, तर ग्रामीण भागात राबणाºया असंख्य ताराराणींचा आहे. कष्टकरी, गरजू लोकांसाठी काम करण्याचा संस्कार आई-वडिलांकडून मिळाला. समाजातील अनेक प्रश्न पाहून ते सोडविण्यासाठी काम करण्याची संवेदना निर्माण झाली. त्यातून सामाजिक कार्य सुरू केले.
ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष अशोक पर्वते, एस. एन. पवार, प्रकाश हिलगे, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. डी. आर. मोरे, कांचन पाटील, अस्मिता पाटील, सी. आर. गोडसे, आदी यावेळी उपस्थित होते. विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यातून त्यांनी विद्यापीठ आणि या पुरस्काराच्या परंपरेची माहिती दिली. डॉ. सुजय पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय, एस. डी. चव्हाण यांनी गौरवपत्राचे वाचन केले. पी. आर. मंडलिक यांनी आभार मानले.शेतकºयांना योग्य हमीभाव मिळायला हवाया पुरस्कार वितरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये मिश्रा म्हणाल्या, शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफी करणे हा अंतिम उपाय नाही. आत्महत्या थांबविण्याकरिता शेतीमालाला योग्य हमीभाव मिळायला हवा. त्यांच्या शेतीमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यायला हवी.
बहादरपूर येथे भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञाननिकेतनद्वारे आम्ही चार कोटींची अर्थसाहाय्य योजना शेतकºयांसाठी राबविली आहे. त्याअंतर्गत दूध संकलन, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्रीतून ग्रामविकासाचे पाऊल टाकले आहेत. दुष्काळी भागात महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामविकास साधण्यासाठी पावले टाकली आहेत.
सामाजिक कार्य दर्शविणारे व्यासपीठया कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नीलिमा मिश्रा यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. त्यामध्ये आरोग्यपूर्ण गाव, सक्षम बचतगट, गोधडी प्रकल्प, आदींची मांडणी केली होती.