कोल्हापूर : ग्रामीण भागात दूध व्यवसाय हा प्रमुख बनला असून, आता महिलांनी दुग्ध प्रक्रिया उद्योगाकडे वळावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंगाडे यांनी केले.
जागतिक दुग्ध दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे व महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. झिंगाडे म्हणाले, भादोले व इचलकरंजी येथे गारमेंट युनिट सुरू असून, बचत गटातील महिलांनी आपल्या व्यवसाय वृध्दीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. वैयक्तिक व सामूहिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्यावतीने पाठबळ दिले जाईल. सध्या जिल्ह्यात ४ हजार २०३ बचत गटांच्या माध्यमातून ६१ हजार २०३ महिलांचे संघटन आहे. यापैकी २६ हजार ३५० दूध उत्पादक महिला आहेत. प्रत्येक महिलेकडे सरासरी तीन पशुधन असून, ते खरेदीसाठी विविध बँकांनी अर्थसहाय्य केले आहे. महामंडळाच्यावतीने नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून आगामी काळात क्लस्टर विकसित करण्याचा मानस असल्याचेही झिंगाडे यांनी सांगितले.
डॉ. ज्ञानेश्वर पलंगे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक जयवंत जगताप, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सुधीर सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. महामंडळाचे लेखापाल विनायक कुलकर्णी यांनी आभार मानले.