कोल्हापूर : गॅस, पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, महागाई विरोधात शुक्रवारी कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने चुलीवर जेवण बनवून आंदाेलन करण्यात आले. या वेळी ‘भाजप सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, खाद्यतेल, डिझेल-पेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजे, मोदी सरकार हाय हाय, भाजप सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा देण्यात आल्या.
काँग्रेस कमिटीसमोर झालेल्या या आंदाेलनानंतर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सरलाताई पाटील म्हणाल्या, यांनी मै देश बिकने नहीं दुंगा म्हणणारे मोदी देश विकायला निघाले आहेत. उज्वला गॅस योजना देऊन सिलिंडर महाग केला आणि महिलांना पुन्हा चुलीपुढे आणून ठेवले. भाज्या, तेल, जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढवले. महिलांचे आर्थिक गणित कोलमडले असून याचा आम्ही निषेध करतो. निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनशून्य व चुकीच्या धोरणांमुळे गॅस, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा त्रास घराघरांतील महिलांना होत असून त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी महिलाध्यक्षा संध्या घोटणे, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, शुभांगी साखरे, हेमलता माने, वैशाली महाडिक यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
--
फोटो नं ०९०७२०२१-कोल-महिला काँग्रेस निदर्शने
ओळ : कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी काँग्रेस कमिटी येथे चुलीवर जेवण बनवून महागाई विरोधात निदर्शने करण्यात आली. (छाया : नसीर अत्तार)
----