एकनाथ पाटील
कोल्हापूर : महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाण्यातील वाढत्या लाचखोरीला आळा बसावा, प्रत्येक महिला कॉन्स्टेबल सक्षम बनावी, त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक बनावे यासाठी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या कारभाराची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कॉन्स्टेबलच्या हाती सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सर्वच पोलीस ठाण्यात महिलाराज दिसणार आहे.
जिल्ह्यांत २९ पोलीस ठाणी असून, प्रत्येक पोलीस ठाण्याचा कार्यभार ठाणे अंमलदार (पुरुष) सांभाळत असतात. पोलीस निरीक्षक किंवा सहायक पोलीस निरीक्षक हा फक्त पोलीस ठाण्यावर नियंत्रण ठेवत असतो. तक्रार किंवा गुन्हा स्टेशन डायरीत दाखल करण्याचे काम ठाणे अंमलदार करत असतात.
खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, ठकबाजी, फसवणूक, बलात्कार, गर्दी, मारामारी, बनावट नाणी, अपहरण, आत्महत्येचा प्रयत्न, विनयभंग, जुगार, मटका, आदी वेगवेगळे गुन्हे नेहमी प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. ही दाखल करण्याचे काम ठाणे अंमलदार करत असतात.
महिला सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व कॉन्स्टेबल यांना साईडपोस्टची कामे दिली जातात. पुरुष व महिला पोलिसांमध्ये समन्वय राहावा, कामाची जबाबदारी समजावी, तसेच पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक व कार्यक्षमपणे चालावे यासाठी महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यांच्या कारभाराची जबाबदारी महिला पोलिसांवर सोपविण्यात आली आहे.
ठाणेप्रमुख, ठाणे अंमलदार, मदतनीस, संगणक, वायरलेस विभाग, बिटमार्शल आदी विभागांची जबाबदारी महिला पोलिसांवर सोपविण्यात आली असून तसा आदेशही वायरलेसवरून दिला आहे.सक्षमपणे पुढे येण्यासाठी उपक्रमपोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिसांना वायरलेस कक्षामध्ये चोवीस तास ड्युटीसाठी बसविले जात असे. त्याचबरोबर काही महिला आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांची ड्युटी लावली जात असे. तक्रारी ऐकणे व त्या स्टेशन डायरीमध्ये दाखल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जात नसे. त्यामुळे गुन्हे कसे दाखल करतात, कोणत्या गुन्ह्यासाठी कोणते कलम लावले पाहिजे, याबाबत बहुतांश महिला पोलीस अनभिज्ञ आहेत. महिलांनीही सक्षमपणे पुढे येऊन पोलीस ठाण्याचे कामकाज चालवावे, हा उद्देश समोर ठेवून पोलीस ठाण्यांचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांनी सांगितले.सहा निर्भया पथकांचा गौरवजिल्ह्यांत सहा निर्भया पथके आहेत. ही पथके स्थापन केल्यापासून महाविद्यालयीन आवारात तरुणींच्या होणाऱ्या छेडछाडीचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यांत निर्भया पथकांचा चांगलाच दरारा निर्माण झाला आहे. उद्यान, कॉलेज आवारात हुल्लडबाजी करणाऱ्यांना चांगलाच दम टाकला आहे.
गेल्या वर्षभरात या पथकाने सुमारे दोन हजार युवकांवर कारवाई केली आहे. त्यांची ही कारवाई गौरवास्पद असल्याने गुरुवारी सकाळी अकरा वाजता महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस मुख्यालय परिसरातील अलंकार हॉल येथे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपअधीक्षक संजय मोहिते यांचे हस्ते विशेष प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
महिला दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, उपअधीक्षक कार्यालय व पोलीस ठाणे येथील दिवसभराचे सर्व कामकाज महिला अधिकारी व कर्मचारी पाहणार आहेत तसे आदेशही संबंधित विभागाच्या व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.संजय मोहिते,पोलीस अधीक्षक