कोल्हापूर: जागतिक महिला दिन शुक्रवारी सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा होत असताना मिरजकर तिकटी येथील नुतन मराठी विद्यालयात अतिशय भावूक आणि उत्साही वातावरणात हा दिन साजरा झाला.
मुलांच्या आयुष्यात सर्वश्रेष्ठ गुरु आईच असते. आयुष्यातील या पहिल्या गुरुला वंदन करावे, मुलांसाठी ती घेत असलेल्या कष्टाची जाणिव मुलांनाही व्हावी या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.नुतन मराठी विद्यालय शाखा नंबर एक या शाळेत एकत्रितपणे या मुलांनी आपापल्या आईच्या गळ्यात पुष्पहार घालून, तिचे चरण पुजन करुन तिला ओवाळून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. महिला दिनी आपल्या मुलांकडून झालेल्या या आगळ्यावेगळ्या सन्मानाने महिलाही भारावून गेल्या.
शाळेने पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम घेतला होता. यातून आई आणि मुलांच्या आयुष्यातील बंध अधिक दृढ करण्याबरोबरच महिलांविषयीचा आदर मुलांच्या मनात वाढीस लावण्यासाठी अशाप्रकारचे उपक्रम नेहमीच घेत राहावेत अशा भावना व्यक्त केल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वायदंडे, शाळेच्या व्यवस्थापिका श्रीमती महाराज यांच्या प्रोत्साहनाने शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यात पुढाकार घेतला.