कोल्हापूर : महिलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लढा देऊन स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आता त्यांचा लढा देशाला सुराज्य मिळविण्यासाठी सुरू आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी रविवारी येथे केले. करवीर नगर वाचन मंदिर येथे आम आदमी पार्टीच्या जिल्हा शाखेतर्फे दिल्ली निवडणुकीत कोल्हापुरातून प्रचाराला गेलेल्या व विजयाचे शिलेदार बनलेल्या कार्यकर्त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होेते.यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. नलगे यांच्या हस्ते पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष नारायण पोवार, प्रवक्ते नाथाजीराव पोवार, जसवंत पवार, डॉ. सुभाष आठले यांची होती.प्रा. चंद्रकुमार नलगे पुढे म्हणाले, जागृती ही समाजातूनच होत असते, त्याची प्रचिती दिल्लीच्या निकालावरून आली. केजरीवाल यांचा विजय हा जागतिक विजय असून, तो सर्वांच्या आशास्थानामुळे झाला. अशा विजयांमुळे बळ मिळत असते. ते देण्याचे काम कोल्हापूरच्या शिलेदारांनी केले आहे. पुरातन काळापासून आतापर्यंत अखंड मानवजातीला महिलांनीच तारलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांनी लढा उभारून देशाला स्वराज्य मिळवून दिले. आताही त्या देशाला सुराज्य मिळवून देण्यासाठी लढत आहेत. ते म्हणाले, जात, पात, धर्म यांच्या पलीकडे असणारा आम आदमी पक्ष आहे. अलीकडे जातीयतेवर आधारलेले पक्ष बोकाळले आहेत. त्यांचे सत्य आपल्यासमोर आता येत आहे.नारायण पोवार म्हणाले, ‘आप’च्या विचारांची लाट होणे गरजेचे असून, ते विचार गावागावांत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. समाजाच्या बळावरच पक्षाचे काम सुरू आहे.नाथाजीराव पोवार म्हणाले, दिल्लीत प्रचारासाठी कोल्हापुरातून गेलेल्या कार्यकर्त्यांना विशेषत: महिलांना भाषेची, वातावरणाची अडचण आली; परंतु त्यावर मात करून त्यांनी ‘आप’च्या विजयात मोलाचा वाटा उचलला.नीता नारायण पोवार म्हणाल्या, आपल्यासोबत प्रचारासाठी आलेल्या महिलांनी आपल्या म्हशी शेजारी बांधून, तसेच पाहुण्यांकडे ठेवून महत्त्वपूर्ण वेळ दिला. त्यांच्या या त्यागाचाही यशात मोलाचा वाटा आहे.यावेळी दिल्लीला गेलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)‘आप’चे शिलेदारकार्यक्रमात उत्तम पाटील, नीलेश रेडेकर, आदम शेख, नीता पोवार, सोनाबाई पाटील, सखुबाई पाटील, अंजनाबाई मुळीक, आक्काताई हिरवे, रंजना पाटील, बाळासाहेब जाधव, तुकाराम मोहिते, कुमुदिनी डफळे, जसवंत पवार, अरुण भोसले, विश्वनाथ शेट्टी, डॉ. मानवेंद्र गणबावले, राधिका पाटील, हौसाबाई गायकवाड या दिल्लीला गेलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार झाला.
महिलांचा लढा आता सुराज्यासाठी
By admin | Published: February 15, 2015 11:57 PM