कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर उद्या, शनिवारी सकाळी साडेआठ वाजता इंडियन वुमेन्स फुटबॉल लीग स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होत आहे. स्पर्धेची सुुरुवात ओरिसाच्या रायझिंग स्टुडंट क्लब विरुद्ध जम्मू-काश्मीरच्या जे अॅँड के स्टेट स्पोर्टस कौन्सिल या संघांत होणार आहे. स्पर्धेकरिता गुरुवारी सायंकाळपर्यंत आठ संघ कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वतीने या स्पर्धा प्रथमच ‘के.एस.ए.’च्या संयोजनाखाली कोल्हापुरात भरविल्या जात आहेत. या देशातील नामांकित महिला फुटबॉलपटू आपल्या खेळाचा करिश्मा पात्रता फेरीतील सामन्यांत दाखविणार आहेत. या स्पर्धेतून मुख्य स्पर्धेसाठी दोन संघ पात्र होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
रायझिंग स्टुडंट क्लब, बडोदा फुटबॉल संघ, इंदिरा गांधी अकॅडमी स्पोर्टस, जे अॅँड के संघ, इंडिया रश सॉकर, ईस्टर्न स्पोर्टिंग युनियन, युनायटेड वॉरियर्स, क्रिप्शा हे संघ कोल्हापुरात दाखल झाले असून काही संघांतील खेळाडूंनी सायंकाळी पोलो मैदान व पोलीस मुख्यालयाच्या मैदानात सराव केला. मणिपूरच्या ईस्टर्न व क्रिप्शा या दोन संघांत भारतीय संघातील जवळजवळ ८० टक्के फुटबॉलपटू आहेत. त्यांच्या खेळाचे प्रदर्शन उत्कृष्ट आहे. त्यामुळे त्यांचा खेळ पाहण्याची संधी स्थानिक महिला फुटबॉलपटूंना मिळणार आहे. याशिवाय १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकातही तेथील पाच युवक भारतीय संघातून खेळले होते. त्यामुळे मणिपूरचा फुटबॉल पॅटर्न त्यांच्या सामन्यातून पाहण्यास नक्कीच मिळणार आहे.कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील पोलो मैदानावर इंडियन वुमेन्स लीग स्पर्धेत सहभागी झालेल्या मणिपूरच्या संघाने गुरुवारी सायंकाळी सराव केला.