कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत विरोधी पालकमंत्री सतेज पाटील- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आघाडीचे महिला राखीव गटातील उमेदवार श्रीमती अंजना केदारी रेडेकर ११३ मतांनी विजयी झाल्या. त्यांना १८७७ मते मिळाली आहेत. सत्तारुढ आघाडीच्या उमेदवार शौमिका अमल महाडिक या ४० मतांनी विजयी झाल्या असून त्यांना १७६४ मते मिळाली आहेत. त्यांच्या विजयाने सत्तारुढ आघाडीचे विजयाचे खाते उघडले आहे. विजयी झालेले आरक्षित गटातील पाचही उमेदवार प्रथमच निवडून आले आहेत.
विद्यमान संचालिका अनुराधा पाटील यांना प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. त्या शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या आई तर माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या पत्नी आहेत. विरोधी आघाडीत आमदार विनय कोरे यांना घेतल्याच्या रागातून त्यांनी सत्तारुढ आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चंदगडचे आमदार व गोकूळचे संचालक राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्मिता पाटील यांनाही पराभव स्विकारावा लागला. याउलट अंजना रेडेकर यांनी मात्र व्यक्तिगत संपर्काच्या बळावर विजय मिळवला. त्या पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या प्रमुख कार्यकर्त्या मानल्या जातात. विजयी पाच संचालकांपैकी अमर पाटील हे आमदार विनय कोरे गटाचे, माजी आमदार मिणचेकर शिवसेनेचे तर बयाजी शेळके व अंजना रेडेकर हे टीम सतेज पाटील गटाचे आहेत. शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. प्रचारात त्यांनी सत्तारुढ आघाडीकडून धुरा सांभाळली होती.दुपारी सव्वा वाजता जाहीर झालेल्या पाचपैकी चार जागा विरोधी आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामध्ये इतर मागासप्रवर्गातून अमर यशवत पाटील, मागासवर्गीय प्रवगातून डॉ सुजित मिणचेकर व भटक्या विमुक्त प्रवर्गातून बयाजी शेळके हे विजयी झाले आहेत.महिला राखीव गटातून दोन्ही आघाडीस प्रत्येकी एक जागा मिळाली. महिला राखीव गटात सुरुवातीपासूनच अत्यंत चुरस झाली. त्यामध्ये अंजना रेडेकर या पहिल्या फेरीपासून निर्विवादपणे प्रत्येक फेरीत मताधिक्कय घेत पुढे राहिल्या. विरोधी आघाडीच्या शौमिका महाडिक सातव्या फेरीपर्यंत मागे होत्या. त्यांनी आठव्या व नवव्या फेरीमध्ये आघाडी भरून काढून विजय खेचून आणला.महिला राखीव गटातील उमेदवारांना मिळालेली अंतिम मते अशी
- अंजना केदारी रेडेकर (विरोधी आघाडी) : १८७७ - विजयी
- शौमिका अमल महाडिक (सत्तारुढ आघाडी) : १७६४ - विजयी
- पराभूत उमेदवार : सुश्मिता राजेश पाटील (विरोधी आघाडी) - १७२४
- अनुराधा बाबासाहेब पाटील सरुडकर (सत्तारुढ आघाडी) - १७००
- वैशाली बाजीराव पाटील (अपक्ष) : १२