सर नुकताच जागतिक महिला दिन होऊन गेला. त्यामुळे तुम्ही आम्हाला महिला आरोग्याचा आयुर्वेदाने कसा विचार केला आहे ते सांगा,’’ दिप्ती म्हणाली.‘‘मुळात स्त्रीच्या जीवनाच्या तीन महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली कुमारिका, दुसरी प्रौढावस्था आणि तिसरी वृद्धावस्था. या तिन्ही टप्प्यांवर त्यांच्या आरोग्याच्या समस्या वेगळ्या आहेत. पुरुषांपेक्षासुद्धा स्त्रीच्या आरोग्याचा एका वेगळ्या पातळीवरून विचार करावा लागतो.’’मुलगी जेव्हा वयात येते त्यावेळी तिचा मासिक धर्म चालू होतो. (काही लोक त्याला मूर्खासारखं प्रॉब्लेम असंही म्हणतात.) ही एक चांगली नैसर्गिक क्रिया आहे. पुढे स्त्रीला मातृत्वासाठी तयार होण्यासाठी निसर्गाची ती एक खूण आहे. अनेकवेळा अशा मासिक धर्माच्यावेळी काही मुलींना पोटात दुखतं. खरं तर मासिकस्राव ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यानं त्यावेळी पोटात दुखायला नको. आपल्या डोळ्यातून पाणी येताना डोळे दुखतात का? किंवा आपण थुंकताना तोंड दुखतं का? मासिक स्रावसुद्धा इतक्या सहजतेने व्हायला हवा.आयुर्वेदाप्रमाणे ज्या एका वायूच्या प्रेरणेने हे स्राव बाहेर नेण्याचे कार्य होते; त्याच्या कामात अडथळा येतो. याला आज-काल पाहायला मिळणारं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे वाढणारी जाडी. आज-काल तरुण मुलींमध्ये जाडीचं प्रमाण वाढत आहे, ही निश्चितच चिंताजनक गोष्ट आहे. त्याहीपेक्षा काळजी करण्यासारखी गोष्ट ही आहे की, पोट, मांड्या, नितंब या भागातच चरबीचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुढे जाऊन वंध्यत्वासारखे आजार होऊ शकतात. सतत एका जागेला बसून राहणे, खेळ -खेळलेच तर बैठे खेळ खेळणे आणि व्यायामाचा अभाव ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत. या सर्वांच्याबरोबरीने आणखी एक अत्यंत विचार करायला लावणारे कारण आहे ते म्हणजे आपण तथाकथित ‘पौष्टिक’ आहार खातो. त्यामध्ये चरबीयुक्त (मेद वाढविणारे) आणि पिठूळ (साखर वाढविणारे) पदार्थ अधिक प्रमाणात जातात. फळं, चोथायुक्त पदार्थ खाण्यात जवळजवळ नसतातच. त्यामुळे शरीरावर चरबी वाढते.यासाठी वातशामक औषधे वापरण्यास आयुर्वेदाने सांगितले आहे. आयुर्वेदाने आणखी एक गोष्ट सांगितली आहे आणि ती मननीय आहे. अगदी लहानपणी गोवर किंवा कांजिण्या येऊन गेल्या असल्या तर पुढे जाऊन पाळीच्यावेळी पोटात दुखू शकते. त्या गोष्टींचा विचार करून चिकित्सा केली, तर पुढे कधीच पोट धरून लोळायची वेळ येत नाही. ‘‘खरं तर पोटात दुखू लागल्यास नुसतं गरम पाण्याची पिशवी घेऊन शेकलं तरी बरं वाटतं. काहीवेळा वेदनाशामक औषधे घेण्याची वेळ येते.’’ पंचकर्मापैकी स्नेहन, स्वेदन व बस्ती हे उपचार छानच उपयोगी पडतात. फक्त ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केले गेले पाहिजेत. स्त्रियांच्या इतर आजारांची माहिती पुढील भागात घेऊ.- वै. विवेक हळदवणेकर
महिलांचे आरोग्य...
By admin | Published: March 10, 2017 11:46 PM