जयसिंगपूर : मायक्रो फायनान्स कंपन्यांबरोबरच बँकांची कर्जे माफ करावीत, या मागण्यांसाठी शिरोळ तालुका पुरग्रस्त निवारण समितीच्यावतीने राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी घोषणा देत सुमारे तीन तास ठिय्या मारला.
पूरग्रस्त महापुरातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सक्तीने कर्जवसुली सुरू केली. यामुळे या कंपन्यांच्या कर्जमाफीबरोबरच विविध मागण्यांप्रश्नी पूरग्रस्त निवारण समितीच्यावतीने गेल्या सात महिन्यापासून गावपातळीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलने छेडण्यात आली. मात्र कर्जमाफीबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने महिलांनी हे आंदोलन केले.
पूरग्रस्त महिलांना न्याय द्या, प्रत्येक कुटूंबाला सानुग्रह अनुदान द्या, शिरोळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, असे फलक घेवून महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.