कोल्हापूर : येथील स्त्रीवादी चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या प्रा. आशा नरेंद्र कुकडे (वय ८३) यांचे शुक्रवारी दुपारी ताराबाई पार्कातील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. स्त्रीशिक्षण, संघटन, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिलांना न्याय मिळावा, यासाठी त्या झटत राहिल्या. त्या अर्थशास्त्राच्या चांगल्या अभ्यासक होत्या. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)चे दिवंगत नेते प्रा. नरेंद्र कुकडे यांच्या त्या पत्नी होत.
गेले काही दिवस वृद्धापकाळाने त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात प्रा. प्राजक्ता व डॉ. सोनाली या मुली आहेत. प्रा. नरेंद्र कुकडे यांनी सुटा संघटनेद्वारे प्राध्यापकांचे संघटन केले. अन्यायाला वाचा फोडली, या सगळ्या प्रवासात त्यांना सावलीसारखी साथ देताना प्रा. आशा कुकडे यांनीही सहभाग घेतला. सुटाची महिला शाखा सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्या त्याच्या प्रमुख होत्या. नाइट कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये त्या प्राध्यापक होत्या. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यासोबत त्यांनी अनेक चळवळीत काम केले. त्यांच्यामुळे अनेक महिला भारतीय महिला फेडरेशनशी जाेडल्या गेल्या. त्या गांधीवादी विचारांच्या होत्या. स्वातंत्र्यसैनिकांची संघटना, खादी ग्रामोद्योग संघ अशा संघटनांमध्येही त्यांनी योगदान दिले. मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाने महिलांना बाहेरून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुभा दिली, त्यावेळी त्या अर्धवट शिक्षण झालेल्या महिलांसाठी वर्ग चालवायच्या. कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा झाल्यानंतर त्यांनी पीडित महिलांची प्रकरणे न्यायालयापर्यंत नेली, त्यांना न्याय मिळावा यासाठी त्या झटल्या. तोडकर महाराजविरोधी आंदोलन, दारूबंदी चळवळ, आशा, मोलकरीण संघटना बांधणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.
------------
फोटो : २६०२२०२१-कोल-आशा कुकडे-निधन
---