कोल्हापूर : मृग नक्षत्राच्या आगमनाने पावसाळ्याची सुरुवात होते. या दिवशी म्हणजेच ७ जूनला शेवग्याची भाजी करून खाण्याची फार जुनी परंपरा आहे. बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी लागणारी प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी शेवग्याची भाजी उपयुक्त ठरते. याचा विचार करून येथील निसर्गमित्र परिवारामार्फत आयोजित केलेल्या शेवगा संवर्धन सोहळ्याला महिला मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या बरोबरीनेच शेवगा लागवडीचाही त्यांनी निर्धार केला आहे.
ऋतुमानानुसार आरोग्यकारक आहार सांगणाऱ्या आपल्या समृद्ध अशा खाद्यसंस्कृतीमध्ये शेवग्याला अतिशय महत्त्व दिलेले आहे. परंतु, झपाट्याने बदलणाऱ्या वेगवान जीवनशैलीमुळे या परंपरेचे विस्मरण होत असल्याचे दिसून येत आहे. मृग नक्षत्राच्या आरंभी व तेथून पुढील पावसाळ्याचे चार महिने तसेच हिवाळ्याचे चार महिने शेवग्याचे सेवन जरूर केले पाहिजे. उन्हाळ्याच्या तडाख्यातून एकदम पावसाळी थंड वातावरणात जात असताना क्षारधर्मीय असणारी शेवग्याची भाजी या बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी लागणारी प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते.
या समृद्ध खाद्यपरंपरेची माहिती, शेवग्याचे आरोग्यविषयक महत्त्व, शेवग्याचे स्वादिष्ट व चटपटीत पाककृतीची माहिती, शेवग्याची लागवड याबरोबरच शेवग्याविषयीच्या अंधश्रद्धा व गैरसमज यांची माहिती सर्वांना व्हावी म्हणून निसर्गमित्र संस्था गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. यासाठी १ ते ६ जून या कालावधीत संस्थेने "शेवगा संवर्धन सोहळा २०२१" या सोहळ्याचे ऑनलाईन आयोजन केले होते. यावेळी शेवग्याचे आहारातील व आरोग्यविषयक महत्त्व, शेवगा लागवड व संवर्धन व शेवग्याच्या विविध पाककृतींची माहिती विविध तंत्राद्वारे देण्यात आली. या सोहळ्यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील विविध महिला मंडळांनी सहभाग नोंदविला. निसर्ग मित्रचे अनिल चौगुले, उमाकांत आवटे, अस्मिता चौगुले, स्वरा आवटे यांनी महिलांना ही माहिती दिली.
(बातमीदार : संदीप आडनाईक)