कोल्हापूर : गणेशोत्सव म्हटला की पुरुषांचीच मक्तेदारी, असे ठरलेले गणित होय. मात्र, याला अपवाद ठरतोय खासबागमधील ‘प्रिन्स क्लब’. या क्लबच्या यंदाच्या गणेशोत्सवाची संपूर्ण जबाबदारी महिला, मुलींच्या खांद्यावर दिली आहे. यात अध्यक्षा म्हणून सरस्वती पोवार, तर उपाध्यक्षा म्हणून मानसी पिसाळे या मुलींची निवड करण्यात आली.
पुरुष संस्कृतीला थोडीशी बगल देत १९७७ ला स्थापन झालेल्या मंगळवार पेठेतील खासबागमधील प्रिन्स क्लबचा यंदाच्या गणेशोत्सव हा महिला, मुलींचाच असला पाहिजे असा आग्रह परिसरातील महिला व मुलींनी लावून धरला. त्यांच्या विनंतीला मान देत क्लबच्या पुरुष पदाधिकाºयांनी मागे हटत सत्तेची धुरा महिलांच्या हाती दिली.
समाज प्रबोधनाचे व्यासपीठ म्हणून या मंडळाचा नावलौकिक आहे. यात मंडळाने पारंपरिक वाद्यांचा वापर करीत गणेशाचे कायम आगमन व विसर्जन केले आहे. तसेच गणेशमूर्ती दान करून नेहमीच पर्यावरणाचा ºहास रोखण्यास मदत केली आहे. यासह गणेशोत्सवात हमखास आबालवृद्धांच्या मनोरंजनाबरोबरच प्रबोधन होईल असेच देखावे या मंडळाने सादर केले आहेत.
चांगले संस्कार होतील व समाज प्रबोधन होईल असेच प्रयत्न या मंडळाकडून प्रत्येक गणेशोत्सवात केले जातात. त्यामुळे या क्लबचा देखावा काय असेल याची उत्सुकता अनेकांना लागून राहते. यासह मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी कधी सायकलवरून, तर कधी बैलगाडीतून लग्नाची वरात काढून वेगळेपण जपले आहे. अशा या क्लबच्या अध्यक्षा नव्हे, तर संपूर्ण कार्यकारिणीच महिलांची करून नवा इतिहासच या क्लबने रचला आहे. यापूर्वी मंगळवार पेठेतील जंगी हुसेन तालीमचा सर्व कारभार महिलांच्या हाती सोपविला होता. त्यानंतर प्रथमच गणेशोत्सवाचा भार प्रिन्स क्लबने मुलींच्या व महिलांच्या हाती सोपवून कोल्हापूरकरांसमोर हा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. निवडण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीत पूजा जगताप (सचिव), सिद्धी काटकर (खजानीस), तर सदस्यपदी आरती बोरपाळकर, अरुणा खोत, अश्विनी जगताप, नीता पोलादे, विद्या राऊत, स्वाती साबळे, तनुजा भोसले यांचा समावेश आहे.मागील वर्षी क्लबच्या परिसरातील ५० महिलांनी लेझीम खेळत गणेशमूर्ती आणली. यंदा तर महिला, मुलींनी आमच्याकडे धुरा द्यावी म्हणून आग्रह धरला. त्यामुळे हा बहुधा कोल्हापुरातील पहिलाच प्रयोग आमच्या क्लबने केला आहे. एका अर्थाने मुली, महिलाही या उत्सवाचा आनंद खºया अर्थाने घेतील.- अशोक पोवार,माजी अध्यक्ष, प्रिन्स क्लब, खासबाग, कोल्हापूर