कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळाला. अधून-मधून जोरदार सरी कोसळायच्या, त्यानंतर ऊन लगेचच ऊन पडायचे. गगनबावड्यात मात्र पावसाची रिपरिप राहिली. धरणातून विसर्गही कमी झाला असून नद्यांची पातळी कमी होऊ लागली आहे.सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात उघडझाप पाहायला मिळाली. सळसळ सरी येतात आणि क्षणात गायब होऊन पुन्हा ऊन पडते, याचा अनुभव गेली दोन दिवस कोल्हापूरकरांना येत आहे. गगनबावडा व आजरा तालुकावगळता इतर तालुक्यांत ऊन-पावसाचा खेळच अनुभवयास आला. गगनबावड्यात मात्र दिवसभर रिपरिप राहिली.धरणक्षेत्रातही जोर कमी झाला असून विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणाच्या सांडव्यातून १४२८ तर वीजनिर्मितीसाठी १४०० घनफूट विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद ७७२६ तर दूधगंगेतून १८०० घनफूट विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पातळी कमी होत असून दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी दोन फुटांनी कमी झाली. सध्या ३०.२ फुटांवर पातळी असून अद्याप २२ बंधारे पाण्याखाली आहेत. चार राज्य व आठ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे.दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १४.८५ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ४९.५० मिलीमीटर झाला. चार खासगी मालमत्तांची पडझड होऊन ८० हजारांचे नुकसान झाले आहे.धरणातील पाणीसाठा, टीएमसीमध्ये असा -राधानगरी (८.३५), वारणा (३२.३२), दूधगंगा (२४.६६), तुळशी (३.३४), कासारी (२.६६), कडवी (२.५२), कुंभी (२.५८), पाटगाव (३.७२).