कोल्हापूर : गीतकार, संगीतकार यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकीचे उपासक. शब्दांमागे दडलेला भावार्थ, रसिकांच्या मनाला भिडेल अशा संगीतासाठी त्यांचा कायम आग्रह असायचा. कोल्हापुरात त्यांच्या सुगम संगीताच्या मैफली गाजल्या. येथील संगीत क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांशी त्यांचा जवळचा स्नेह होता. काही वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठातही त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.भातुकलीच्या खेळामधली, या जन्मावर या जगण्यावर, जीवनात ही घडी अशीच राहू दे, दिवस तुझे हे फुलायचे, येशील येशील राणी...अशा अवीट गोडीच्या गीतांचा नजराणा देणारे संगीतकार, गीतकार कवी यशवंत देव यांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीतातला देव हरवला, अशा शब्दांत मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.यशवंत देव यांचा कोल्हापूरशी संबंध विविध कार्यक्रम आणि कार्यशाळेच्या निमित्ताने आला. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या दोन दिवसीय सुगम संगीत कार्यशाळेचे आयोजन केले होते. अभिरुची संस्थेच्यावतीने वसंतराव देशपांडे स्मृती संगीत स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त संस्थेने १५-१६ वर्षांपूर्वी यशवंत देव यांच्या गाण्यांचा कार्यक्रम घेतला होता व त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरणही झाले.बासरीवादक सचिन जगताप यांच्याशी यशवंत देव यांचा विशेष स्नेह होता. जगताप यांनी देव यांच्या पुण्यातील एका व कोल्हापुरातील एका मैफलीत बासरीवादन केले होते. या निमित्ताने जगताप यांना यशवंत देव यांचा सहवास लाभला. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या घरी जाण्याचा योग आला.
उपजत कविमन असल्याने ते रोजच्या घटनांवर विडंबन कविता करायचे. प्रवासातही मिश्कीली सुरू असायची. गाण्यात नवनवीन प्रयोग सुरू असायचे आणि ते कॅसिनोवर वाजवायचे. एका मैफलीत गायक व्यवस्थित गात नव्हता, तर त्यांनी गायकाला काही सूचना करून पुन्हा गायला लावले, त्या गाण्याला रसिकांची विशेष दाद मिळाली, अशी आठवण जगताप यांनी सांगितली.गायन समाज देवल क्लबच्या नूतनीकरणासाठी संस्थेला मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात यशवंत देव यांच्या हस्ते २ लाखांचा धनादेश देण्यात आला होता. दत्ता डावजेकर फौंडेशनच्या वतीने २००८-०९ च्या दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात स्मृतीगंध लिसनर्स क्लबला प्रमोटिंग लाईट म्युजिक अॅन्ड सिनेसंगीत या कार्यासाठी देव यांच्या हस्ते अंबाबाईची मूर्ती देऊन गौरविण्यात आले होते. विनय डावजेकर, श्रीकृष्ण कालगावकर, प्रभाकर तांबट, धनंजय कुरणे, ‘लोकमत’चे तत्कालीन संपादक राजा माने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता.
मराठी भावसंगीतातला मोठा संगीतकार, गीतकार आपल्यातून हरपला आहे. त्यांच्या गीतांच्या चाली वरवर सोप्या वाटत असल्या तरी, त्या गायला कठीण असायच्या. भावसंगीतात त्यांनी शब्दप्रधान गायकी रूढ केली.श्रीकांत डिग्रजकर (गायन समाज देवल क्लब)
वसंतराव देशपांडे स्मृती संगीत स्पर्धेनिमित्त झालेल्या कार्यक्रमात माझा यशवंत देव यांच्याशी संपर्क आला. त्यांची ही मैफल त्यावेळी खूप गाजली होती. रसिकांचे प्रेम आणि गाणे या पलीकडे त्यांना काहीच महत्त्वाचे नव्हते, अगदी पैसासुद्धा.प्रसाद जमदग्नी (अभिरुची नाट्यसंस्था)
मी यशवंत देव यांच्या दोन मैफलींमध्ये बासरीवादन केले. सादरीकरणादरम्यान त्यांचे प्रत्येक कलाकारावर बारीक लक्ष असायचे. प्रसंगानुरूप लगेच संगीताची चाल बदलायचे आणि त्याची माहिती वादकांना द्यायचे इतकी लवचिकता आणि रसिक मनाचा अभ्यास त्यांनी केला होता.सचिन जगताप (बासरीवादक)