आदमापूर ते निढोरी एका बाजूचे काँक्रिटीकरण व आदमापूरपासून कुरकलीपर्यंत रस्त्याचे कार्पेटचे काम एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन जितेंद्रसिंग गडोख कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोज देशपांडे यांनी आंदोलकांना दिले. आश्वासनानुसार एका महिन्याच्या आत काम पूर्ण झाले नाही तर कंपनीची वाहने आणि यंत्रसामुग्री अडवण्यात येतील असा इशारा भीम आर्मी,कागल तालुका अपंग संघटनेच्या आंदोलकांनी यावेळी दिला.
मुरगुड येथे भीम आर्मी जिल्हा सचिव बाळासोा कांबळे, तालुका अपंग संघटना उपाध्यक्ष साताप्पा डेळेकर यांची व कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोज देशपांडेसह पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.यामध्ये रस्ता लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आज रास्ता रोकोचे आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी राधानगरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अमित पाटील उपस्थित होते. बैठकीत प्रोजेक्ट मॅनेजर मनोज देशपांडे यांना आंदोलकांच्या रोषास सामोरे जावे लागले.
मुदाळ तिट्टयापासून ते सोनगेपर्यंत रस्त्याच्या अडलेल्या कामामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबाबत कंपनी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी वारंवार आंदोलन, अर्ज, विनंत्या केल्या. पण तरीही आंदोलन झाले की तात्पुरते काम करून तोंडाला पाने पुसण्याच्या कंपनीच्या प्रवृत्तीमुळे तेथील नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत.