कोल्हापूर: कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाची जबाबदारीही वाढली आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी दक्ष राहून काम करा, असे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, वैद्यकीय समन्वय अधिकारी व प्रभाग समिती सचिव यांची निवडणूक कार्यालय येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वांच्या सहकार्याने कोरोनाचा प्रसार रोखूया. यासाठी सर्वांनी टीमवर्कने काम करूया. यासाठी सर्वांनी आपापल्या क्षेत्रात अधिक कार्यक्षमतेने व काळजी घेऊन काम करणे गरजेचे आहे. प्रभाग समिती सचिवांनी भागामध्ये कुठेही व्यक्ती मृत झाल्यास त्या ठिकाणी गर्दी होऊ देऊ नये.
अंत्यसंस्कारांसाठी दहाच लोक जातील याची काळजी घ्यावी. प्रभागामध्ये जनजागृतीसाठी शिक्षकांची मदत घ्या. यासाठी त्यांना प्रभागातील ठिकाणे निश्चित करून द्या. ते कोरोना योद्धा म्हणून त्या-त्या भागात दैनंदिन जनजागृती करतील. ज्यांच्या घरी लग्न समारंभ असेल त्यांनी उपस्थितांची यादी विभागीय कार्यालय अथवा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे द्यावी.
आपापल्या भागामध्ये ताप, सर्दी, खोकला यांची काही लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीस त्वरित दवाखान्यामध्ये तपासणीसाठी पाठवा. वैद्यकीय अधिकारी यांनी सर्व्हेक्षणावर अधिक भर द्यावा. दाट वस्ती असणाऱ्या ठिकाणी दक्ष राहून काम करावे. कंटेन्मेंट झोनमध्ये अधिक लक्ष देऊन काम करावे. आपली व आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या.