राही-मानबेट-चौके ही गावे राधानगरी दाजीपूर अभयारण्य परिसरातील आहे. तसेच हा भाग घाटमाथ्यावरील असून विकासापासून उपेक्षित असून येथे पावसाचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे. चौके गावाच्या पूर्वेकडून धामणी तर पश्चिम -उत्तर दिशेने हारप नदी वाहत असल्याने पावसाळ्यात चौक - मानबेट राई या गावांना बेटाचे रूप तयार होऊन जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
या सर्व गावांना वाहतुकीने जोडण्यासाठी शासनाने ३o-३५ वर्षांपूर्वी हरप नदीवर सिमेंटचे नळे असलेला कमी उंचीचा मोरीवजा पूल बांधला असल्याने तो निरुपयोगी ठरला होता.
दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीने जुना जीर्ण मोरी पूल तुटून मोठे भगदाड पडले होते. तर वरील स्लॅब वाहून गेला होता. त्यामुळे येथून वाहतूक करणे धोक्याचे ठरत होते. पावसाळ्यात पुलावरून सतत पाणी वाहत असल्याने परिसरातील एसटी वाहतुकीसह खासगी व दूध वाहतूक बंद पडून जनतेचे प्रचंड हाल होत होते.
पर्यायी व्यवस्था म्हणून उभारलेला लोखंडी साकव जागोजागी सडल्याने या वरूनच विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. याची दखल आमदारांनी घेत येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे पन्नास लाख रुपये खर्चाचा मोठ्या आकाराच्या सिमेंट पाइपचा मोरीपूल मंजूर करून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मोरस्कर, उपअभियंता तुषार बुरुड, अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदार सुभाष जाधव, अजय भंडारी यांनी या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करत अवघ्या पंधरा दिवसात पूर्ण केले.
फोटो ओळी
चौके येथे अवघ्या पंधरा दिवसांत नवीन बांधलेला पूल.