कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीघाटावरील गेल्यावर्षी पुरामध्ये ढासळलेल्या तटबंदीच्या बुरुजाचे बांधकाम शुक्रवारपासून महापालिकेतर्फे सुरू झाले. हे काम लवकर सुरू व्हावे यासाठी लोकआंदोलन झाले होते. त्याला यश आले. चळवळीतील कार्यकर्ते फिरोज शेख यांनी या कामात गेली सहा महिने केलेल्या पाठपुराव्यास चांगले यश आले.घडले ते असे : गेल्यावर्षी पुराच्या पाण्याने साधारणत: जानेवारीमध्ये ढिसूळ झालेला हा बुरूज ढासळला; परंतु महापालिकेने त्याकडे तीन महिने लक्षच दिले नाही. या बुरुजाची दुरुस्ती न झाल्यास घाटाची उर्वरित तटबंदीही कोसळण्याची भीती होती. त्यामुळे परीख पूल नूतनीकरण समिती, कोल्हापूर आर्किटेक्ट्स व इंजिनिअर्स असोसिएशनने बुरुजाची दुरुस्ती करण्याची मागणी महापालिकेकडे केली.
निवेदन दिल्यावर लगेच दखल घेईल तर ती महापालिका कसली, असा अनुभव कार्यकर्त्यांना आला. त्यामुळे फिरोज शेख, राजवर्धन यादव, संतोष रेडेकर, संतोष आयरे, रियाज बारगीर आदींनी पुढाकार घेऊन हे काम न झाल्यास आम्ही कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही, असे अनोखे आंदोलन हाती घेतले. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाल्यावर या प्रश्नात आ. ऋतुराज पाटील व आ. चंद्रकात जाधव यांनी तातडीने लक्ष घातले व महापालिकेला या बुरुजाची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
नुसते आंदोलनाचा इशारा देऊन न थांबता या कामाचे आर्किटेक्ट्स असोसियशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्या पुढाकारातून आर्किटेक्ट प्रशांत हडकर यांनी त्याचे मोफत डिझाइन करून महापालिकेला दिले. त्यानुसार महापालिकेने या कामासाठी सुमारे ५ लाखांचा निधी मंजूर करून निविदा मंजूर केली; परंतु तोपर्यंत पाऊस सुरू झाल्याने हे काम थांबले होते; परंतु आता गेली आठ दिवस चांगले ऊन पडल्याने त्या काळात किमान त्याचे फाउंडेशन बांधून घेतले तरी इतर तटबंदीला धोका पोहोचणार नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते; परंतु महापालिकेचा त्यास प्रतिसाद नव्हता.मग यंत्रणा हलली...दोन दिवसांपूर्वी फिरोज शेख यांनी आपण या कामासाठी पाण्यात उभे राहून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. त्याची दखल लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर व हवालदार रेडेकर यांनी घेतली. त्यांनी शेख यांना व महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना पोलीस ठाण्यात बोलवून चर्चा केली. सरनोबत यांनी तातडीने संबंधित ठेकेदारास काम करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तीन ट्रॅक्टरद्वारे ढासळलेल्या बुरुजाची दगड-माती उचलण्यास सुरुवात झाली.