कोल्हापूर : निधीअभावी दीर्घकाळ रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध झाला असून ३१४ कोटी रुपयांची निविदा उद्या, शुक्रवारी प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती करवीरचे आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांनी दिली.
राधानगरी तालुक्यातील राई येथील ३.८५ टीएमसी क्षमतेच्या धामणी प्रकल्पामुळे गगनबावडा, पन्हाळा व राधानगरी तालुक्यांतील जवळपास दीड हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दरवर्षी भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. गतवर्षी या प्रकल्पासाठी निविदा निघाली होती. मात्र कोरोना प्रकोपामुळे पुढील प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटून धामणी प्रकल्पाचे काम थांबले. ते सुरू करण्याची मागणी केली असता निधीअभावी रखडले असून, अर्थमंत्री अजित पवार यांना भेटून निधीची मागणी करण्यास सांगितले. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. त्यामुळे मंत्री पवार यांनी या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये निधीची तरतूद करून दिली. आगामी काळात धामणी प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
ही कामे होणार...
आता प्रकल्पाचे उर्वरित मातीकाम, प्रवेश व पुच्छ कालव्यासह सांडवा तसेच सिंचन तथा विद्युत विमोचकाचे उर्वरित काम, अप्रोच रस्ता व पुलांचे बांधकाम केले जाणार आहे.