लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप यादीचे काम गतीने सुरू झाले आहे. मंगळवारी (दि. १७) जिल्हा बँकेकडून सहकार विभागाकडे यादी सादर केली जाणार आहे. साधारणत: ३ सप्टेंबरला प्रारूप, २७ सप्टेंबरला अंतिम यादी तर ८ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सहकार विभागाने तयारी सुरू केली आहे.
राज्यातील १२ जिल्हा बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने सहकार विभागाला दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी सहकार प्राधिकरणाने बारा जिल्ह्यातील सहकार विभागाला प्रारूप यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा बँकेच्या पातळीवर प्रारूप यादीची छाननी सुरू झाली असून मंगळवारी यादी सहकार विभागाकडे सादर केली जाणार आहे. त्यानंतर सहकार विभाग त्यांच्या पातळीवर यादीची छाननी करून साधारणता ३ सप्टेंबरला प्रारूप यादी प्रसिध्द केली जाणार आहे. या यादीवर हरकती त्यावरील सुनावणीसाठी २२ ते २३ दिवसांचा कालावधी गेल्यानंतर २७ सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर ८ ऑक्टोबरच्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. ५ नोव्हेंबरला दिवाळी संपत असल्याने ७ किंवा ८ नोव्हेंबरला मतदान घेण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे.
सांगली, सातारा बँकेची प्रक्रिया सुरू
कोल्हापूर विभागातील कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्हा बँकांच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होत आहे. या दोन्ही बँकांची प्रारूप यादी तयार करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.