म्हाकवे : हणबरवाडी (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेमध्ये नेमणूक आणि पगारपत्रकासह खर्चही याच शाळेवर पडत असताना, गेल्या १४ महिन्यांपासून डॅनियल फिलीप बारदेस्कर हे शिक्षक तमनाकवाड येथे कार्यरत आहेत. यामुळे हणबरवाडीतील पद रिक्त राहिल्याने गेल्या वर्षभरापासून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकासह त्याला पाठिशी घालणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ यंत्रणेवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हमिदवाडा (ता. कागल) येथील सामजिक कार्यकर्ते विजय मारुती साटपे यांनी जि.प.चे मुख्याधिकारी कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे. तसेच विजय साटपे यांनी माहिती अधिकाराखाली या शिक्षकाच्या पगारपत्रकापासून हजेरीपत्रक, वर्षभरात हणबरवाडी शाळेला कोणकोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या, शेरेबुकामध्ये याबाबत काय नोंदी केल्या, यांचीही सखोल ४१९ पानांची माहिती मिळविली आहे. हणबरवाडी येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून, येथे चार शिक्षकांची नेमणूक आहे. मात्र, बारदेस्कर हे जून २0१५ पासून या शाळेकडे फिरकलेलेच नाहीत. त्यामुळे सातही वर्गांची जबाबदारी तीन शिक्षकांवरच आहे. तर यापैकी एक मुख्याध्यापक असल्याने त्यांना अन्य शैक्षणिक कामे, केंद्रशाळा, तालुक्याची मिटिंग याबाबतचा विचार केला, तर दोनच शिक्षकांवर सातही वर्गांची जबाबदारी पडते. यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच याचा थेट परिणाम होणार आहे. याला जबाबदार कोण? असा सवालही पालक वर्गासह साठपे यांनी केला आहे. तसेच कागलसारख्या राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या तालुक्यातील शाळेत या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होतेच कसे? हा महत्त्वाचा विषय आहे. साटपे यांनी या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊन ठोस पुरावेही उपलब्ध करून ते जि.प.च्या सीईआेंकडे सादर केले आहेत. यामध्ये २२ नोव्हेंबर २0११ चा नियुक्ती आदेश, वर्षभरात केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, सभापती, जि.प.चे शिक्षणाधिकारी, गटशिक्षणधिकारी यांनी दिलेल्या शाळा भेटींचा अभिप्राय, तसेच येथील १३ जून २0१५ ते आॅगस्ट २0१६ अखेरचे शिक्षक हजेरीपत्रक, गैरहजेरी काळातील संबंधित शिक्षकाला अदा केलेली पगारपत्रके, आदी लेखी पुराव्यांचाही यामध्ये समावेश आहे. साहेबांनी शाळा तपासणी केलीच कसली ? वरिष्ठांनी अचानकपणे शाळांना भेटी देऊन शाळा तपासणी करावयाची असते. मात्र, सर्वच वरिष्ठांनी हणबरवाडीतील शाळेला भेटी देऊन शेरे बुकात नोंदी करून आपल्या कामाचा सोपस्कार पूर्ण केला. मात्र, तब्बल वर्षभर एखादा शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणी गैरहजर असूनही या गंभीर बाबींकडे त्यांनी कानाडोळा केलाच कसा? हा प्रश्न आहे.
काम तमानकवाड्यात, पगार हणबरवाडीत
By admin | Published: October 21, 2016 12:35 AM