कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणूक खर्चाचा तालुकानिहाय आढावा घेण्याचे काम निवडणूक यंत्रणेकडून सुरू आहे. तीन-चार दिवसांत खर्चाचा पूर्ण तपशील निवडणूक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी मागासवर्गीय गटातील इच्छुकांकडून पाचशे रुपये तर इतर गटांतील इच्छुकांकडून दोन हजार रुपये अनामत घेतली आहे. अर्ज दाखल केलेल्यांची संख्या पाहता लाखो रुपये अनामत रक्कम होते. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या उमेदवाराने माघार घेतली, त्यांची अनामत रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संघाच्या निवडणूक खर्च किमान ६० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग, पोलीस यंत्रणा यामुळे खर्चात वाढ झाल्याचे दिसते. मतदानाची प्रक्रिया तालुका पातळीवर घेतल्याने संबधित तहसीलदारांकडून निवडणूक खर्चाचा आढावा घेतला जात आहे. येत्या तीन-चार दिवसांत खर्चाचा पूर्ण तपशील आल्यानंतर तो मंजुरीसाठी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविला जाणार आहे.