कोल्हापूर शहरात पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या स्मारक उभारावे, अशी मागणी झाली होती. महापालिका प्रशासनाकडून नवीन वाशी नाका परिसरात स्मारकासाठी जागा निश्चित केली आहे. दीड कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी ५० लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी २० लाखांचा निधीही दिला. स्मारकामध्ये शिल्प उभारले जाणार आहे. होळकर यांनी पानपोई, घाट बांधले, मंदिरांचा जीर्णोद्धार, लोकांना मदत, महिलांची फौज अशी विविध समाजहिताची कामे केली. या कामांचा समावेश शिल्पामध्ये असणार आहे.
चाैकट
असे होणार होळकर स्मारक
फायबरमध्ये ३ बाय ४ चे शिल्प
उद्यान, वस्तुसंग्रहालय, वाचनालय
अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा
आर्ट गॅलरी
प्रतिक्रिया
अहिल्याबाई होळकर यांचे कोल्हापूरशी ऋणानबंध आहेत. त्यांचा पुतळा अथवा स्मारक येथे नाही. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे ३१ मे रोजी होळकर जयंतीला स्मारकाची मागणी केली होती. त्यांनी यासाठी पुढाकार घेत निधीचीही तरतूद केली. माजी महापौर निलोफर आजरेकर यांनीही तातडीने अंमलबजावणी केली. समाजाचे महत्त्वाचे काम पूर्ण होत आहे.
बबनराव रानगे, मल्हार सेना
चौकट
महापालिकेकडून सुरू असलेल्या स्मारकाची कामे (कंसात मंजूर निधी)
ज्येष्ठ नेते ॲड. गोविंदराव पानसरे (३७ लाख)
छत्रपती संभाजी महाराज (१५ लाख)
महात्मा गांधी (१५ लाख)
चौक़ट
पूर्ण केलेले स्मारक आणि पुतळे सुशोभिकरण (कंसात खर्च झालेले निधी)
शिवाजी चौकातील शिवाजी महाराज यांचा पुतळा (८० लाख)
राजर्षी शाहू महाराज दसरा चौक (१८ लाख)
आयोध्य टॉकीज येथील आईसाहेब महाराज पुतळा (१० लाख)
निवृत्ती चौकातील अर्धा शिवाजी पुतळा (३५ लाख)
चौकट
स्मारक, पुतळ्यांसाठी ५ कोटींचा निधी
कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरातील नागरी समस्या सोडविण्याबरोबरच सामाजिक बांधीलकही जपण्याचे काम केले जात आहे. महापुरुषांचा इतिहास नवीन पिढीला माहिती होण्यासाठी ठिकठिकाणी स्मारके उभारली जात आहेत तसेच पूर्वीचे पुतळ्याचे सुशोभीकरणही केले जात आहे. आतापर्यंत यासाठी ५ कोटींपेक्षा जास्त निधी खर्च झाला आहे.